पत्नीला जाळून मारल्याप्रकरणी पतीस जन्मठेप
   दिनांक :07-Mar-2019
पुराव्याअभावी एकाची निर्दोष मुक्तता
 
वाशीम : पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतून तिला जाळून मारल्याप्रकरणी आज न्यायालयाने पतीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली तर एका आरोपीची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.
 

 
 
याबाबत सविस्तर असे की, मृत्यूपुर्व अर्चना किशोर कवळे हिने दिलेल्या जबानीनुसार तिचे माहेर माळीपुरा कारंजा हे असून, रितीरिवाजाप्रमाणे माझे लग्न किशोर जनार्दन कवळे यांच्याशी झाले. मात्र, लग्नानंतर काही दिवस सुखाचे गेल्यानंतर पती किशोर हा चरित्र्यावर संशय घेऊन नेहमीच मारहाण करुन त्रास देत होता. ८ मे २०१३ रोजी आरोपी पती किशेार पोहा येथे घरी आला आणि नेहमीप्रमाणे माझ्या चरित्र्यावर संशय घेऊन मला बेदम मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता अंगावर घासलेट टाकुन पेटवून दिले. त्यावेळी भासरा शेखर जनार्धन कवळे यांनी मला पकडून ठेवले. यामध्ये गंभीर जळाल्यामुळे अर्चना हिला अकोला येथे दवाखान्यात उपचारार्थ दाखल केले असता दोन दिवसानंतर उपचारदरम्यान तिचा मृत्यू झाला. अर्चनाच्या जबाबावरून पोलिसांनी आरोपी किशोर जनार्दन कवळे व भासरा शेखर जनार्दन कवळे यांच्याविरुद्ध कलम ३०२, ३०७, ४९८ (३४) प्रमाणे गुन्हा दाखल केला.  पती किशोर कवळे यांच्या विरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्याने आरोपीस अती. जिल्हा सत्र न्यायधीश एस. बी. पराते यांनी जन्मठेपेची शिक्षा व ३ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. तर भासरा शेखर जनार्दन कवळे यांची पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली. सरकार तर्फे अ‍ॅड. जी. डी. गंगावणे यांनी काम पाहीले.