नागपूरच्या माझी मेट्रोचा थाटात शुभारंभ
   दिनांक :07-Mar-2019
- देशातील ग्रीन मेट्रो नागपुरात : पंतप्रधान
- ब्रॉडगेज मेट्रोने विदर्भ जोडणार : नितीन गडकरी
- मेट्रो अर्थव्यवस्थेची मुख्य धमनी : मुख्यमंत्री
- नेतेद्वयांनी आश्वासन पाळले,
नागपूर,
साडेचार वर्षापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूमिपूजन केलेल्या नागपूर मेट्रोचा आज सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हीडीओ िंलकद्वारे शुभारंभ करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खा. विकास महात्मे, खा. कृपाल तुमाने, महामेट्रोचे प्रबंध संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित, केंद्रीय नगरविकास सचिव दुर्गाशंकर मिश्र, शहरातील सर्व आमदार व महापौर नंदा जिचकार, मेट्रो प्रशासनाचे पदाधिकारी उपस्थित होते.
 


 
 
वर्धा मार्गावरील एअरपोर्ट साऊन या नव्या स्टेशनच्या प्रांगणात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. चार वाजता नितीन गडकरी यांचे लखनऊ येथून खाजगी विमानाने नागपुरात आगमन झाले, त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर नेते सभास्थानी आले. स्वागतभाषणातून डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी मेट्रोच्या प्रवासाची माहिती दिली. त्यानंतर सचिव दुर्गाशंकर मिश्र यांनी देशभरातील मेट्रो नेटवर्कमध्ये नागपूरची माझी मेट्रो सर्वार्थाने निराळी असल्याचे सांगितले. तर नितीन गडकरी यांनी, मेट्रो प्रकल्पाचे काम वेळेत पूर्व केल्याबद्दल अधिकार्‍यांची प्रशंसा केली तर नवा ब्रॉडगेज मेट्रोचा प्रस्ताव असून त्यातून संपूर्ण विदर्भ जोडण्यात येणार असल्याचे सांगितले. मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस यांनी, विदर्भासाठी हा ऐतिहासिक दिवस असून मेट्रोमुळे अर्थव्यवस्था व रोजगार वाढीस मदत मिळेल असे सांगत, मेट्रो अर्थव्यवस्थेची मुख्य धमनी ठरणार असल्याचे सांगितले.
 

 
 
याच दरम्यान साडेपाच वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑनलाईन आले आणि त्यांनी नागपूर शहरातील नागरिकांशी थेट मराठीतून प्रारंभ केला. देशातील सर्वात ग्रीन मेट्रो होण्याचा मान नागपूरला मिळाला आहे. त्याचसोबत आता कॉमन मोबिलिटी कार्डच्या माध्यमातून देशभरात कुठेही कोणत्याही सार्वजनिक वाहनप्रणालीत प्रवास करणे शक्य होणार असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे मुख्यमंत्र्यांच्या आमंत्रणाचा स्विकार करुन मे, जून नंतर नागपुरात येण्याचेही पंतप्रधानांनी मान्य केले. तत्पूर्वी ड्रीम कम ट्रु या प्रदर्शनाचे उद्घाटनही मुख्यमंत्र्यांनी केले तसेच मेट्रो प्रशासनाने तयार केलेल्या कॉफी टेबल बूकचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले.