स्वच्छ सर्वेक्षणात कारंजा जिल्ह्यात प्रथम
   दिनांक :07-Mar-2019
 
कारंजा घाडगे : स्वच्छ सर्वेक्षण २०१९ चे निकाल नुकतेच घोषीत झाले असून त्यामध्ये एक लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या भारतातील पश्चिम विभागातील १००२ शहरातून कारंजा घाडगे शहर १०४ व्या क्रमांकावर तर महाराष्ट्रातून ८५ व्या क्रमांकावर आले आहे तसेच कारंजा घाडगे शहर एक लाख पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरामध्ये वर्धा जिल्ह्यातून प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले आहे.
 

 
 
कारंजा शहरातील सर्व आबालवृद्ध स्त्री,पुरूष नागरिक,शाळा,महाविद्यालयाचे सर्व विद्यार्थी,प्राचार्य, मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारीवृंद,विविध शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारीवृंद,विविध सामाजिक संस्था,व्यापारीबांधव, प्रसिध्दी विभागातील प्रतिनिधी तसेच कारंजा नगरपंचायतचे पदाधिकारी,नगरसेवक व कर्मचारीवृंद यांनी स्वच्छ सर्वेक्षण २०१९ मध्ये कारंजा घाडगे शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी जे सहकार्य केले त्यामुळेच हे नामांकन प्राप्त झाले असल्याचे नगरपंचायतच्या मुख्याधिकारी पल्लवी राऊत यांनी तरूण भारतशी बोलतांना सांगीतले.१ नोव्हेंबर २०१८ ते ३१ जानेवारी २०१९ या कालावधीत स्वच्छता मोहिम यशस्वीपणे राबविण्यात आली.दररोज एका वार्डातील स्वच्छता मोहीम राबविण्यासाठी हाती खराटा घेऊन नागरिक स्वयं प्रेरणेने पुढाकार घेत होते.प्लास्टीकबंदी सारखे उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आले.कचरा बँकेची निर्मीती,शहराच्या मुख्य ठिकाणी ओला कचरा ,सुका कचरा टाकण्यासाठी लावण्यात आलेल्या कचरा कुंड्या,सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेत होणारी साफसफाई कचरा गोळा करण्यासाठी फिरणारी घंटागाडी, स्वच्छता संदेश देणार्या शालेय विद्यार्थ्यांनी रंगविलेल्या बोलल्या भिंती व पथनाट्य अशा विविध उपक्रमांमुळे सदरचे नामांकन कारंजा शहराला प्राप्त होण्यात मोलाचा वाटा असून कारंजा शहरातील नागरीकांनी यापुढेही स्व॔यप्रेरणेने शहर स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन याप्रसंगी मुख्याधिकारी यांनी नागरिकांना केले आहे.