आज 'माझी मेट्रो' चे लोकार्पण; पंतप्रधान दाखवणार हिरवी झेंडी
   दिनांक :07-Mar-2019
नागपूर:
माझी मेट्रोत बसून शहराचे सौंदर्य न्याहाळण्याची इच्छा असणाऱ्या नागरिकांना गुरुवार ७ मार्चपासून शहरात माझी मेट्रो धावताना दिसणार आहे. 'माझी मेट्रोचे'  उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडीओ लिंकच्या माध्यमातून करणार आहे. 
 
 
 
 
उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन आज  दुपारी ३.३० वाजता साऊथ एअरपोर्ट मेट्रोस्थानकावर करण्यात आले असून, याप्रसंगी मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार हरदीपसिंग पुरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदा जिचकार यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ . बृजेश दीक्षित यांनी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतील एका समारोहातून सायंकाळी ५.३० वाजता माझी मेट्रोला हिरवी झेंडी दाखवणार आहे.
 
उद्घाटन झाल्यावर गाडी साऊथ एअरपोर्ट मेट्रोस्थानक ते खापरी मेट्रोस्थानकादरम्यान धावणार असून कार्यक्रमात मेट्रोच्या कॉफी टेबल बुकचे अनावरणही मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.  एअरपोर्ट मेट्रो स्थाकावर ‘माझी मेट्रोचा'  सुवर्ण प्रवास या चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार आहे. हे प्रदर्शन पुढील सात दिवस नागरिकांना सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत बघता येणार आहे.