म्हणून सईने सोशल मीडियाला ठेवले होते दूर
   दिनांक :07-Mar-2019
 
 

 
 
दुनियादारी, बालक पालक, कांदे पोहे  यांसारख्या चित्रपटामधून आपल्या दर्जेदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप टाकणारी अभिनेत्री सई ताम्हणकर सध्या आघाडीच्या अभिनेत्रींनपैकी एक आहे. सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असणाऱ्या सईने गेल्या महिन्याभरापासून त्याला दूर सारले होते. सईने फेब्रुवारी महिन्यात सोशल मीडियावरून ती डिजीटल डिटॉक्सवर जात असल्याचे जाहीर केले होते. एक महिना डिजीटल डिटॉक्सवर गेलेल्या सईने या दरम्यान पाँडेचरीला जाऊन सचिन कुंडलकरांच्या आगामी सिनेमाचे चित्रीकरण केले. नुकतीच सई पाँडेचरीवरून मुंबईत परत आली असून ती सोशल मीडियवरही परतली आहे.  सई ताम्हणकर सोशल मीडियावरून चाहत्यांशी संवाद साधताना म्हणाली, “हो, मी आता पाँडेचरीवरून आणि सोशल मीडिया डिटॉक्सवरूनही एका महिन्यांनी परतलेय. माझ्या सोशल मीडिया डिटॉक्सचा मला शुटिंगसाठी खूप फायदा झाला. पण सोशल मीडियामुळे चाहत्यांशी रोजच्या रोज संपर्कात असण्याची सवय असल्याने मी चाहत्यांना खूप मिस केले. या एका महिन्यात खूप काही घडलंय. मी पाँडेचरीत काय-काय केले ते लवकरच मी चाहत्यांसोबत सोशल मीडियावरून शेअर करेनच.” सईच्या या सोशल मीडिया पोस्टलाही तिच्या चाहत्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला.