अल्पेश ठाकोर भाजपात जाणार?
   दिनांक :08-Mar-2019
गुजरात,
पाटीदार नेता हार्दिक पटेल हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा जोर धरत असतानाच, आता ओबीसी नेता अल्पेश ठाकोर मात्र भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आपल्या पुढील राजकीय वाटचालीबद्दल पत्रकार परिषद घेऊन अल्पेश ठाकोर आज खुलासा करणार आहे.
 
 
२०१७च्या विधानसभा निवडणुकांमध्ये ठाकोर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. काँग्रेसच्या तिकीटावर अल्पेश ठाकोर आमदारही झाले. मात्र निवडणुकीनंतर काँग्रेसने ठाकोर समाजाची एकही मागणी पूर्ण केली नाही. तसेच, ठाकोर समाजाला अत्यंत अपमानास्पद वागणूक देण्यात आली. गुजरातमध्ये बिहारी मजुरांसोबत झालेल्या हिंसाचाराचा ठपका अल्पेश ठाकोर आणि त्याच्या समाजावर लावण्यात आला. यामुळे अखेर त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे.
काँग्रेस सोडून अल्पेश ठाकोर भाजपात जाईल अशा चर्चा बऱ्याच दिवसांपासून रंगत होत्या. याबाबत अल्पेश ठाकोर आज सविस्तर खुलासा करणार आहे. अल्पेश ठाकोरच्या भाजप प्रवेशाचा काँग्रेसला किती फटका बसणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.