गुगलचा 'डूडल'द्वारे महिलांना सलाम
   दिनांक :08-Mar-2019
नवी दिल्‍ली,
आज जगभरात आंतरराष्‍ट्रीय महिला दिन साजरा केला जात आहे. महिला सबलीकरण आणि महिलांच्या सन्मानार्थ हा दिवस जगभरात साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर गुगलने एक विशेष गुगल डूडल साकारून महिलांप्रती सन्मान व्यक्‍त केला आहे. या डूडलमध्ये १४ भाषांमध्ये महिलांच्या सशक्‍तीकरणावर अधारित प्रेरणादायी कोट्‍स लिहले असून, ते स्‍लाईड स्‍वरूपात मांडले आहेत.
 
गुगलच्या या विशेष डूडलमध्ये १४ भाषांचा समावेश करण्यात आला आहे. या चित्रावर क्‍लिक केल्‍यास वेगवेगळ्‍या भाषेतील कोट्‍स आपल्‍याला दिसतात. यासोबवच त्‍या महिलांची नावेही आपण वाचू शकतो. ज्‍या महिलांनी हे कोट्‍स दिले आहेत, त्‍यामध्ये भारतीय बॉक्‍सर मेरी कोमचेही नाव आहे. मेरी कोमने यामध्ये महिलांना उद्‍देशून म्‍हटलेय की, तुम्‍ही एक महिला आहात म्‍हणुन स्‍व:ताला कमी लेखू नका. या डूडलला सोशल मीडियावर शेअर करण्याचा पर्यायही देण्यात आला आहे. यामध्ये समाविष्‍ट केलेले प्रेरणादायी कोट्‍स जगभरातील प्रतिभावंत महिलांच्या समुहाव्दारे बनविण्यात आले आहे.
 
 
महिलांच्या आर्थिक, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील महत्‍वपूर्ण आणि गौरवपूर्ण योगदानाला सलाम करण्यासाठी दरवर्षी ८ मार्चला जागतिक महिला दिनाचे आयोजन करण्यात येते. या दिवशी वेगवेगळ्‍या क्षेत्रातील कर्तृत्‍ववान महिलांचा सन्मान करण्यात येतो.  हा दिवस जगातील सर्व विकसीत आणि विकसनशील देशांमध्ये मोठ्‍या उत्‍साहात साजरा केला जातो.