नीरव मोदीचा १०० कोटींचा बंगला जमीनदोस्त
   दिनांक :08-Mar-2019
मुंबई,
पंजाब नॅशनल बँकेला हजारो कोटी रुपयांचा चुना लावत परदेशात पसार झालेला हिरे व्यापारी नीरव मोदीच्या अलिबागमधील किहीम येथील रुप्पन्या बंगला आज जमीनदोस्त करण्यात आला. मोदीचा १०० कोटींचा बंगला पाडण्याच्या कारवाईचा प्रारंभ, मुंबई उच्च न्यायालयातील सुनावणीअंती रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी गेल्या २५ जानेवारी रोजी केला होता.
 
 
 
जेसीबीच्या माध्यमातून हा अत्यंत मजबूत बंगला पूर्णपणे उद्ध्वस्त करणे शक्य झाले नाही. परिणामी, तो डायनामाइट्सच्या माध्यमातून स्फोट घडवून जमीनदोस्त करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला. डायनामाइट्स स्फोटांच्या बाबतचे संपूर्ण सुनियोजित नियोजन तज्ज्ञांच्या मदतीने करून शुक्रवारी हा बंगला जमीनदोस्त करण्याचे काम सुरु झाले. कारवाईकरिता ५० तांत्रिक अधिकारी व कर्मचारी कार्यरत होते. बंगल्याच्या विविध भागांत एकूण ११० डायनामाइट्स लावण्याचे काम गुरुवारी संध्याकाळीच पूर्ण झाले.
 
 
 
जिल्हा प्रशासनाचे अधिकारी, पोलीस, महसूल, बांधकाम अधिकारी, कर्मचारीही यावेळी घटनास्थळी उपस्थित होते. सुरक्षिततेची काळजी म्हणून परिसरातील १०० मीटर पर्यंतचा परिसर मोकळा करण्यात आला होता. तसेच या परिसरात वाहनांनाही बंदी करण्यात आली होती.
 
स्फोटक तज्ज्ञांनी बंगल्यातील ३० पिलरला स्फोटक भरून वायरींग केली. त्यानंतर स्फोट घडवून हा बंगला उद्ध्वस्त करण्यात आला. यासाठी रात्रीपासूनच काम सुरू होते. उपजिल्हाधिकारी भरत शितोळे यांनीही घटनास्थळी येऊन पाहणी केली आहे. नीरव मोदीचा बंगला स्फोटकांनी उडवल्यानंतर काही सेकंदात पत्त्यासारखा कोसळला.
बंगल्याच्या आजुबाजुच्या लोकांना काही काळासाठी सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. तसेच वाहतुकही पूर्ण बंद ठेवण्यात आली आहे. या स्फोटाचा परिणाम २०० मीटर परिसरात जाणवणार आहे.