देखावा नको, कठोर कारवाईच हवी - अमेरिकेची पाकला तंबी
   दिनांक :08-Mar-2019
वॉशिंग्टन,
पुलवामा हल्ल्यानंतर दबाव वाढल्यामुळे अतिरेकी गट आणि त्यांच्या नेत्यांवर कारवाईचा देखावा करू नका, त्यापेक्षा जगाला ठळकपणे दिसेल आणि अतिरेक्यांना कायमची अद्दल घडेल, अशी कठोर कारवाई करा, अशी तंबी अमेरिकेने पाकिस्तानला दिली आहे. भारतीय हवाई दलाने पाकिस्तानातील बालाकोट येथे असलेल्या जैश-ए-मोहम्मदच्या अड्ड्यांवर बॉम्बचा वर्षाव केल्यानंतर पाकिस्तान सरकारने जैशसह अन्य अतिरेकी गटांवर कारवाई सुरू केली आहे. मुंबईवरील हल्ल्याचा सूत्रधार हाफिझ सईदच्या जमात-उद-दावाचे मुख्यालयही सरकारने ताब्यात घेतले आहे, तसेच काही मदरशांवरही कारवाई केली. याच अनुषगाने अमेरिकेच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने पाकिस्तान सरकारला समज दिली आहे.
 
 
 
पाकिस्तानात सुरू असलेल्या कारवाईवर आमचे बारीक लक्ष आहे. केवळ इतक्या कारवाईने आमचे समाधान होणार नाही. ज्या अतिरेक्यांना पाक सरकारने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ताब्यात घेतले आहे, त्यांच्याविरुद्ध यापूर्वीही अशी कारवाई झालेली आहे. ती कारवाई केवळ देखावा ठरली होती. त्यामुळे आता आम्हाला कारवाईचा देखावा मान्य नाही. जगाला ठळकपणे दिसेल, अशी कारवाई अपेक्षित आहे, असे परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते रॉबर्ट पल्लाडिनो यांनी पत्रपरिषदेत सांगितले. आपल्या भूमीचा दहशतवादी कारवायांसाठी वापर होऊ देणार नाही, असे वचन पाकिस्तान सरकारने फार आधीच संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेला दिले आहे. त्या वचनाचे या देशाने काटेकोर पालन करावे, अशी सूचनाही त्यांनी दिली.