कारंजातील गिरीराज जिनिंगला आग
   दिनांक :08-Mar-2019
दोन कोटीचा कापूस जळून खाक
अग्निशमन दलाच्या गाडीची मागणी
 
कारंजा घाडगे : येथील लघुऔद्योगीक वसाहतीतील गिरीराज कापूस जिनींगला विद्युत ठिणगीने आग लागल्यामुळे अंदाजे दोन कोटी रूपयाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. कारंजा घाडगे येथील विशाल शिवनारायण अग्रवाल यांचे मालकीची कापूस जिनींग असून या ठिकाणी कापसापासून तेल,ढेप, सरकी काढण्याचे काम तसेच गठाणीचा उद्योग चालतो.सदर जिनींग मधील मशिन चालू असतांना मजूर काम करीत होते.अचानक दुपारी ४ वाजताचे दरम्यान विद्युत ठिणगी कापसाच्या ग॔जी पर्यंत पोहोचली व कापूस पेटवायला सुरूवात झाली.आग लागताच कामावरील मजूर आरडाओरड करीत सैरावैरा धावत सुटले.
 

 
 
घटनास्थळावर असलेले शिवनारायण अग्रवाल यांनी आग विझविण्यासाठी पाण्याची विद्युत मोटार सुरू करण्यासाठी धाव घेतली असता त्यांचा प्रयत्न असफल ठरला.त्याचवेळी त्यांना आगीच्या झळा लागल्या. त्यांनाही तिथून काढता पाय घेत आपला जीव वाचवावा लागला. त्यांना कारंजा येथे दवाखान्यात आणून भरती केले. या घटनेत त्यांना कोणतीही इजा झाली नाही.आगीची घटना घडताच आजुबाजुच्या लोकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली व पाण्याचे टँकरची व्यवस्था करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.परंतु या आगीत घटनास्थळावरील उघड्यावर असलेला जवळपास पंधराशे क्विंटल कापूस व १०० गठाणी आगीच्या भक्ष्यस्थानी सापडून अंदाजे दोन कोटीचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला. त्यानंतर आर्वी येथून अग्निशमन दलाची गाडी पोहोचली व आग विझविली.या आगीत कोणतीही जिवित हानी झाली नाही. उन्हाळ्याच्या दिवसात वाढत्या आगीच्या घटना लक्षात घेता कारंजा घाडगे येथे अग्निशमन दलाची गाडी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी जोर धरत आहे.