हवाई हल्ल्यानंतर पंतप्रधानांची लोकप्रियता वाढली - ताज्या सर्वेक्षणातील माहिती - राहुल गांधींना उतरती कळा
   दिनांक :09-Mar-2019
नवी दिल्ली,
पुलवामा येथील आत्मघाती हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने पाकिस्तानात घुसून केलेल्या हवाई हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली असून, 62 टक्के जनतेला पुन्हा एकदा नरेंद्र मोदी हेच पंतप्रधानपदी हवे आहेत. याउलट, सर्जिकल स्ट्राईक आणि आताच्या हवाई हल्ल्यावर शंका व्यक्त करून पुरावे मागणारे कॉंगे्रसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या लोकप्रियतेला उतरती कळा लागली असल्याचे एका ताज्या सर्वेक्षणात दिसून आले आहे.
 

 
 
एबीपी न्यूज आणि सी-व्होटर या संस्थांनी हवाई हल्ल्यानंतर काही राज्यांमध्ये हे सर्वेक्षण केले आहे. यात सुमारे 62 टक्के नागरिकांनी मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करताना, देशाची सत्ता पुन्हा एकदा त्यांच्याच हाती सोपविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. राहुल गांधी हे पंतप्रधान असावे, अशी इच्छा बाळगणारा वर्ग फक्त 19 टक्क्यांच्या घरात आहे.
पुलवामा हल्ला होण्यापूर्वी मोदी यांची लोकप्रियता 50 टक्क्यांच्या घरात होती, तर हवाई हल्ल्यानंतर ती 58 टक्के झाली आणि आता 7 मार्च रोजी त्यांच्या लोकप्रियतेत 62 टक्क्यांपर्यंत वाढ झाली असल्याचे या सर्वेक्षणात दिसून आले आहे. 2015 मध्ये मोदी यांच्या नेतृत्वाला 60 टक्के लोकांनी पसंती दिली होती, 2016 मध्ये यात वाढ होऊन हा आकडा 62 टक्के आणि 2017 मध्ये 66 टक्के लोकांनी मोदींना पसंती दिली होती.
 
राहुल गांधी यांच्या लोकप्रियतेत मात्र सातत्याने घट होताना दिसून आली आहे. 14 फेबु्रवारी रोजी गांधींना पसंत करणारा वर्ग 23 टक्के होता, हवाई हल्ला झाल्यानंतर त्यांनी त्यावर शंका उपस्थित केली आणि त्यांच्या लोकप्रियतेत घट होऊन ती 19 टक्क्यांवर आली आणि आता 7 मार्च रोजी त्यांना पसंत करणारा वर्ग फक्त 16 टक्के आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर राहुल गांधी यांच्या लोकप्रियतेत सातत्याने घट होत आहे. 2015 मध्ये त्यांना पसंत करणारा वर्ग 13 टक्के होता, 2016 मध्ये 12 टक्के आणि 2017 मध्ये फक्त 10 टक्के लोक त्यांना पसंत करीत होते.