अमरावतीत दूचाकी चोरीचा भांडाफोड; आठ दुचाकी जप्त
   दिनांक :09-Mar-2019
 
 गुन्हे शाखेच्या कारवाईत एकास अटक
अमरावती : शहरातील दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावण्यात पोलिसांना मोठे यश प्राप्त झाले आहे. गुन्हे शाखेने चोरीच्या आठ दुचाकी जप्त केल्या असून एका आरोपीस अटक करण्यात आली आहे. जुबेर खान वल्द मेहबूब खान असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो सुफियान नगर अमरावतीचा रहिवासी आहे. 
 

 
 
शहरातील वाढत्या चोरीच्या घटनांचा शोध लावण्यासाठी पोलिस आयुक्त संजय बावीस्कर यांनी विशेष पथकाचे गठन केले होते. यात सैय्यद इमरान अली शौकत अली व मोहम्मद इजाज मदार शाह यांना नेमण्यात आले होते. या पथकाने मोटर सायकल चोरीच्या घटनास्थळी पाळत ठेवून दोन आरोपींचे नावे निष्पन्न केली. यापैकी आरोपी जुबेर खान वल्द मेहबूब खान यास शुक्रवार ८ मार्च रोजी शिताफीने अटक करण्यात आली. त्याच्याजवळून चोरीच्या आठ दुचाकी यात (क्र.एम.एच.२७/सी.जी.७५४१, एम.एच./बी.वाय.३५७६, एम.एच.२७/ए.वाय.७०५०, एम.एच.२७/सी.जी.६१०४, एम.एच.२७/बी.के.४८९२, एम.एच.२७/बी.वाय.३३६३, एम.एच.३६/यू.८८८२, एम.एच.२७/ए.जी.०८०३) यांचा समावेश आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचा दुसरा साथीदार हा पसार झाला. सदर आरोपीनी गाडगेनगर, राजापेठ, कोतवाली पोलिस ठाणच्या हद्दीत दुचाकी चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. ही कारवाई पोलिस आयुक्त संजय बावीस्कर, उपायुक्त सोळंके, उपायुक्त शशीकांत सातव, प्रदीप चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे निरीक्षक कैलास पुंडकर, उपनिरीक्षक राम गित्ते, कर्मचारी अरूण कोडापे, हवालदार जगताप, इमारन, इजाज, जावेद, राजूआप्पा, मिश्रा, नांदे, मोहम्मद सुलतान, दत्ता यांनी केली.