धावत्या बसमधून शेतकर्‍याचे ४८ हजार लंपास
   दिनांक :09-Mar-2019
आर्थिक विवंचनेत असलेल्या शेतकऱ्याला आणखी एक धक्का  
 
धामणगाव रेल्वे : चना विकून चूकारा घेऊन जात असलेल्या वृद्ध शेतकर्‍याच्या बॅग मधील रोकड चालत्या बस मधून लंपास केल्याची घटना आज दुपारी ४ दरम्यान घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
चांदुर रेल्वे तालुक्यातील मांडवा येथील  ७५ वर्षीय रामराव खुरपुडे या शेतकर्‍याने शनिवार स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपल्या शेतातला १२.८८ क्विंटल चना व्यापारी प्रमोद मुंधडा यांच्याकडे विकला. चुकार्‍याची रक्कम ४८ हजार २८० रोख घेतली. यामध्ये पाचशेच्या ५०, शंभरच्या २००, विसच्या १००, दहाच्या १०० नोटा अशा ४८ हजाराची रक्कम बॅगमध्येमध्ये त्यांनी ठेवली. स्थानिक शास्त्री चौकातून दुपारी ४ वाजता धामणगाव ते चांदुर रेल्वे विरूळ मार्गे आपल्या मांडवा या गावी जाण्याकरिता ते एसटी बसमध्ये बसले. बसमध्ये प्रवाशांची संख्या फक्त ५ असल्याचे रामराव यांनी आपल्या आपबितीत सांगितले. त्यावेळी प्रवास दरम्यान बसमध्ये त्यांच्या शेजारी पॅन्ट शर्ट व डोक्यात कॅप घातलेला एक अज्ञात भामटा बसलेला होता. पुढे येणार्‍या विरुळ रोंघे येथे तो उतरला व रामराव सुद्धा समोर येणार्‍या आपल्या गावी मांडवा येथे उतरले. रामराव घरी जाऊन त्यांनी रक्कम असलेली आपली शबनम बॅग उघडली असता त्यामधील ५०० च्या व १०० च्या नोटा ४५ हजार रुपये रोख लंपास झाल्याचे उघडकीस आले. आधीच आर्थिक विवंचनेत असलेल्या रामराव यांना चोरीचा धक्का बसला व अचानक भुरळ आल्याने त्यांची प्रकृती बिघडली. सदर प्रकार त्यांच्या मुलाच्या लक्षात येताच त्यांचा मुलगा शरद  खुरपडे याने दत्तापुर पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी दत्तापुर पोलिसात तक्रार देण्यासाठी आलेल्या शेतकर्‍याच्या मुलास तक्रार न घेता वडिलांनाच घेऊन आल्यास तक्रार घेण्यात येईल, असा वरिष्ठांचा आदेश असल्याचे सांगण्यात आले. तो आल्या पावली परत गेला. प्रत्यक्षात वडिलांना घेऊन आल्यावर मात्र रामराव खुरपडे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.