'नया पाकिस्तान म्हणता, मग दहशतवाद्यांवर नयी अ‍ॅक्शन घ्या' , भारताने पाकला फटकारले
   दिनांक :09-Mar-2019
नवी दिल्ली :
 नवी दिल्लीत आज भारतीय परराष्ट्र खात्याकडून पत्रकार परिषद घेण्यात आली. आजचा पाकिस्तान हा 'नया पाकिस्तान' 'नयी सोच का पाकिस्तान' असल्याचा दावा करणाऱ्या पाकमधील राजकीय नेत्यांची भारतीय परराष्ट्र खात्याने या परिषदेदरम्यान शेलक्या शब्दात कानउघाडणी केली. भारताने केलेल्या एअर स्ट्राईकनंतर अनेकदा पाकिस्तानचा खोटरडेपणा उघडा पडला आहे. तर, भारताचे दोन विमाने पाडल्याचा पाकचा दावाही खोटा असल्याचे परराष्ट्र खात्याचे सचिव रवीश कुमार यांनी सांगितले.
 
तसेच नया पाकिस्तान म्हणणाऱ्या पाकिस्तानी नेत्यांना फटकारले . नया पाकिस्तान म्हणता, मग दहशतवाद्यांवर नयी अ‍ॅक्शन घ्या, असे भारताने सुनावले आहे. पाकिस्तानकडून सातत्याने भारताची दोन विमाने पाडल्याचे सांगण्यात येते, मग पाक त्याचे पुरावे का देत नाही ? कुठंय ते व्हिडीओ रेकॉर्डींग, कुठंय त्याची सत्यता, असा प्रश्न रवीश कुमार यांनी पाकिस्तानला विचारला आहे.
 
 
भारताने एफ-१६ पाडले ... त्याचे पुरावेही दिलेत, त्यावर पाकिस्तान काहीच का बोलत नाही? मसूद अझहर पाकिस्तानमध्येच असल्याचे त्यांचे परराष्ट्र मंत्री मान्य करतात, पण त्याच्यावर कुठलीच कारवाई केली जात नाही. पुलवामा दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी जैशने स्वीकारली आहे, हे पाकिस्तान का विसरतंय, असेही भारताने म्हटले आहे.