जीबी बॉक्सिंग स्पर्धा: भारताची दमदार सुरुवात
   दिनांक :09-Mar-2019
फिनलँड येथे सुरू असलेल्या ३८व्या आंतरराष्ट्रीय जीबी बॉक्सिंग स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी दमदार कामगिरीची नोंद केली आहे. बॉक्सर दिनेश डगर याने ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या एवाल्डास पेट्रास्कास याला पराभवाचा धक्का देत उपांत्यपूर्व फेरीत मजल मारली.

 
गेल्या वर्षी इंडिया खुल्या बॉक्सिंग स्पर्धेत रौप्यपदक पटकावणाऱ्या २३ वर्षीय दिनेशने गुरुवारी रंगलेल्या पहिल्या फेरीत पेट्रास्कासला ३-२ असे पराभभूत केले. लिथुयानियाचा पेट्रास्कास हा माजी युवा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता तसेच २०१७च्या युरोपियन अजिंक्यपद स्पर्धेतील कांस्यपदक विजेता बॉक्सर असल्यामुळे दिनेशसाठी हा विजय मोठा मानला जात आहे. आशियाई स्पर्धेतील रौप्यपदक विजेता सुमित संगवान (९१ किलो) आणि युवा गोविंद साहनी (४९ किलो) यांना पुढे चाल मिळाल्याने भारताची दोन पदके निश्चित झाली आहेत.
अंकित खटाना (६४ किलो) याचे आव्हान मात्र पहिल्या फेरीतच संपुष्टात आले. इंग्लंडच्या ल्युक मॅककॉरमॅक याने त्याला ५-० असे सहज पराभूत केले. या स्पर्धेत १५ देशांमधील जवळपास १०० बॉक्सर्सनी सहभाग नोंदवला आहे.