नाकर्ते सरकार, झोपलेला पंतप्रधान चालेल का?पंतप्रधान मोदी यांचा घणाघातअतिरेक्यांना समजेल असेच उत्तर दिले
   दिनांक :09-Mar-2019
नोएडा,
नाकर्ते सरकार आणि झोपलेला पंतप्रधान तुम्हाला या देशाकरिता मान्य राहील काय, असा स्पष्ट सवाल करताना, मुंबईवर 26/11 रोजी भीषण दहशतवादी हल्ला झाल्यानंतरही कॉंगे्रसच्या सरकारने निषेध व्यक्त करण्याशिवाय दुसरे काहीच केले नव्हते. मुंबई हल्ल्यात लष्कर-ए-तोयबाचा हात सिद्ध झाल्यानंतरही हे सरकार शांत कसे राहिले, असा घणाघाती हल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शनिवारी येथे चढविला.
 
 
 
हा नवीन भारत आहे आणि नवी रीती व नव्या नीतीवर काम करीत आहे. 2016 मधील उरी हल्ल्यानंतर आपल्या जवानांनी गुलाम काश्मिरात घुसून सर्जिकल स्ट्राईक केला. भारत अशा प्रकारे कृती करेल, हा विचारही आपल्या शत्रूंनी केला नव्हता. 50 पेक्षा जास्त अतिरेकी आणि काही पाकिस्तानी सैनिकांना ठार केले. आपल्या विरोधकांनी शंका उपस्थित करून पुरावे मागितले. आता पुलवामा हल्ल्यानंतर भारत पुन्हा सर्जिकल स्ट्राईक करू शकतो, हे लक्षात घेऊन पाकने सीमेवर रणगाडे आणि मोठ्या प्रमाणात सैनिक तैनात केले, पण भारतीय हवाई दलाने आकाशातून झेप घेतली आणि पाकिस्तानच्या बालाकोट येथील जैश ए मोहम्मदच्या अड्ड्यांवर हवाई हल्ला केला, विरोधकांनी त्यावरही शंका उपस्थित करीत पुन्हा एकदा पुरावे मागितले. जैशच्या बड्या अतिरेकी नेत्यांनी, हवाई हल्ल्यात त्यांचे अतोनात नुकसान झाल्याचे मान्य केले आहे, पण आपल्या देशातील काही लोकांना पुरावे हवे आहेत. माझ्या सरकारने भ्रष्टाचाराचे सर्व मार्ग बंद केल्याने हे लोक पिसाळले आहेत आणि मला व देशालाही बदनाम करीत आहेत, असा आरोप पंतप्रधानांनी येथे केला. अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी केल्यानंतर आयोजित सभेत ते बोलत होते.
 
उरी येथील हल्ल्यानंतर माझ्या सरकारने दहशतवाद्यांना, त्यांना समजेल त्याच भाषेत उत्तर देण्याचा निर्णय घेतला आणि तीन वर्षांत दोनवेळा त्यांना अद्दल घडवली. माझे सरकार आणि या देशाचा चौकीदार सदैव जागा आहे. देशाच्या सुरक्षेला धक्काही लागणार नाही, असा आमचा ठाम निर्धार आहे, असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. आपण भारताला जखमा देऊ, छुपे युद्ध पुकारू आणि हल्ले करू, भारत आपले काहीच करणार नाही, असाच पाकिस्तानचा समज होता. याचे कारण 2014 पूर्वी केंद्रात सत्तेत असलेल्या रिमोट कंट्रोल सरकारचा व्यवहार होता. आताचे सरकार वेगळे आहे. शत्रूंना धडा शिकविण्याची ताकद या सरकारमध्ये आहे, असे स्पष्ट करताना, जे लोक आपल्या बहाद्दर जवानांवर शंका घेतात, त्यांना आता नागरिकांनीच, तुमचा देशावर व जवानांच्या शौर्यावर विश्वास आहे की नाही, असे स्पष्टपणे विचारायला हवे, असे मोदी म्हणाले. आज प्रत्येक भ्रष्ट नेत्याला मोदीपासून कष्ट होत आहे. देशाचा चौकीदार चोर आहे, असा आरोप करण्याची स्पर्धाच त्यांच्यात सुरू झाली आहे. निदान असे आरोप करून आपल्याला मत मिळतील, असा त्यांचा समज आहे, असेही त्यांनी सांगितले.