जवानाचे दहशतवाद्यांकडून अपहरण झाल्याचे वृत्त खोटे- संरक्षण मंत्रालय
   दिनांक :09-Mar-2019
जवानाचे अपहरण झाल्याची बातमी आल्याने एकच खळबळ माजली होती. मात्र भारतीय लष्करातील जवान मोहम्मद यासीन यांचे अपहरण झाल्याचे वृत्त खोटे असल्याचे संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. पुलवामा दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर जम्मू बस स्थानकावर झालेला ग्रेनेड हल्ला यामुळे आधीच जम्मू काश्मीरमध्ये तणाव असताना जवानाचे अपहरण झाल्याचे  वृत्त चिंताजनक होते. मात्र अपहरण झालेले नसून मोहम्मद यासीन सुरक्षित असल्याचे संरक्षण मंत्रालयाकडून सांगण्यात आले  आहे.
 
 
संरक्षण मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे की, काही प्रसारमाध्यमांमध्ये लष्कर जवान मोहम्मद यासीन यांचे बडगाम येथून अपहरण झाल्याचे वृत्त देण्यात आले असून ते चुकीचे आहे. ते सुरक्षित आहेत. कृपया कोणतेही अंदाज व्यक्त केले जाऊ नयेत असे आवाहनही संरक्षण मंत्रालयाकडून करण्यात आले आहे.
 
 
 
याआधी मोहम्मद यासीन यांचे शुक्रवारी संध्याकाळी दहशतवाद्यांकडून राहत्या घरातून अपहरण करण्यात आल्याचे वृत्त आले  होते . जवान मोहम्मद यासीन हे भारतीय लष्करातील जाकली युनिटचे सदस्य आहेत. बडगाम जिल्ह्यातील क्वाझिपोरा चाडुरा गावचे ते रहिवासी आहेत. शुक्रवारी काही दहशतवादी त्यांच्या घरात घुसले आणि ते यासीन यांना आपल्यासोबत घेऊन गेले, अशी तक्रार या जवानाच्या कुटुंबियांनी पोलिसांमध्ये केली होती. अपहरणाची तक्रार दाखल झाल्यानंतर तात्काळ शोध पथके रवाना करण्यात आली होती. मात्र संरक्षण मंत्रालयाने अपहरणाचे वृत्त फेटाळले आहे.