पाकिस्तान जगात एकाकी पडेल
   दिनांक :09-Mar-2019
अमेरिकन काँग्रेस सदस्याचा इशारा
 वॉशिंग्टन:
 पाकिस्तानने त्यांच्या भूमीतील दहशतवाद नष्ट केला नाही, तर हा देश संपूर्ण जगात एकाकी पडेल, असा इशारा अमेरिकन काँग्रेस सभागृहाच्या परराष्ट्र व्यवहार उपसमितीचे अध्यक्ष अमी बेरा यांनी आज दिला आहे.
 
 
 
भारतातील अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये जैश ए मोहम्मद या संघटनेचा आणि मसूद अझहरचाच हात आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांच्या काळ्या यादीत टाकण्यासाठी पुढाकार घेतला असल्याने, चीनने आपला व्हेटो मागे घेऊन सकारात्मक आणि जागतिक हिताची भूमिका पार पाडायला हवी, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
आपल्या भूमीतील अतिरेक्यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी पंतप्रधान इम्रान खान खरोखरच प्रामाणिक असेल तर यात त्यांना आवश्यक ते सहकार्य करण्याची अमेरिकेची तयारी आहे. दहशतवादाचा नाश झाल्यानंतर पाकिस्तानला आर्थिक विकासही करता येईल, असे मतही बेरा यांनी मांडले.
 
पाकचे एफ-१६ लढाऊ विमान पाडताना चुकीने पाकच्या हद्दीत गेलेले भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांना भारताच्या स्वाधीन करण्याचे एक चांगले काम पाकिस्तान सरकारने केले आहे. आता या देशाने दहशतवादाविरोधात कठोर कारवाई करून जगाचाही विश्वास संपादन करावा, असे त्यांनी स्पष्ट केले.