पाणी टंचाईची एकही तक्रार नको- प्रवीण पोटे पाटील
   दिनांक :09-Mar-2019
 
जिल्ह्याबाहेर चारा नेण्यावर बंदी

पालकमंत्र्यांचे प्रशासनाला सक्त निर्देश
अमरावती: पालकमंत्री पोटे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील पेयजल परिस्थितीबाबत आज  आढावा बैठक झाली. पेयजलाबाबत ३० जूनपर्यंत नियोजन होणे आवश्यक आहे. पाणीटंचाईबाबत प्रत्येक गावाची गरज लक्षात घेऊन परिपूर्ण नियोजन करावे व उपाययोजना राबवाव्यात. एकही तक्रार येता कामा नये. अन्यथा शासनाकडून गंभीर दखल घेतली जाईल, असा इशारा यावेळी पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी दिला.
 

 
 
  जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री, यांच्यासह विविध विभागप्रमुख, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी आदी या बैठकीला उपस्थित होते.
पालकमंत्री पोटे म्हणाले की, जून २०११९ अखेरपर्यंत नियोजन करून जिल्ह्यातील गरज असलेल्या सर्व गावांत प्रभावी उपाययोजना राबवाव्यात. अचलपूरमध्ये ९ विहिरी अधिग्रहित आहेत. उर्वरितबाबत आवश्यक कार्यवाही व्हावी. चांदूर रेल्वेत आमला विश्वेश्वर येथे टँकर सुरू आहेत. तिथे आवश्यक गरज पाहून अतिरिक्त टँकर लावावेत. वरुड, मोर्शी परिसरात टंचाई आहे. प्रत्येक गावातील परिस्थिती जाऊन कार्यवाही व्हावी. चिखलदरा तालुक्यात ९ गावांत टँकर सुरू होत आहेत. जि. प. पाणीपुरवठा विभागाकडून जिल्ह्यात १३१ विंधनविहिरींचे काम सुरू आहे व खासगी १०० विहिरी अधिग्रहित आहेत. विहीर अधिग्रहित केल्यानंतर संबंधितांची देयके वेळेत अदा करावीत.
 
सर्व विभागांनी संयुक्तपणे उपाययोजना राबवाव्यात. उपाययोजना करताना केवळ फोनवर माहिती न घेता प्रत्यक्ष परिस्थिती स्वतः जाऊन पहावी व समस्या सुटल्याची खातरजमा करून घ्यावी, असे नवाल यांनी सांगितले. चारा टंचाई उदभवू नये म्हणून जिल्ह्याबाहेर चारा जाऊ नये यासाठी चाराबंदीचे आदेश निर्गमित करण्याबाबत निर्णयही यावेळी झाला.निवडणुकीदरम्यान पाणीटंचाईसारख्या मूलभूत विषयाकडे दुर्लक्ष होता कामा नये. प्रत्येक बाब जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आणून द्यावी व वेळीच उपाययोजना कराव्यात, असे निर्देशही यावेळी देण्यात आले.