ताय ज्यू यिंगकडून सायना पराभूत
   दिनांक :09-Mar-2019
बर्मिंघम :
 भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल शुक्रवारी पुन्हा एकदा तायवानची ताय ज्यू यिंग हिच्याकडून पराभूत झाली .  पराभवानंतर सायनाचे ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.
 

 
 
  
 या स्पर्धेत सायनाला जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या ताय ज्यू ने ३७ मिनिटांत १५-२१, १९-२१ ने पराभूत केले. उभय खेळाडूंमध्ये झालेल्या २० पैकी केवळ पाच सामन्यांत सायनाने बाजी मारली आहे. ताय ज्यूने सायनाविरुद्ध ओळीने १३ सामने जिंकून एकूण १५ विजयांची नोंद केली आहे.
 
सायनावर तिने पहिल्या गेममध्ये ११-३ अशी आघाडी घेतली होती. नंतर सायनाने १२ पैकी नऊ गुण संपादन करीत १४-१२ अशी पिछाडी भरून काढली. ताय ज्यू ने आघाडी वाढवून २०-१३ अशी केली व पाठोपाठ गेम जिंकला. प्रतिस्पर्धी खेळाडूची दमदार कामगिरी दुसऱ्या गेममध्येही कायम राहिली. तिने ११-८ अशी प्रारंभी आघाडी मिळविली होती. सायनानेदेखील प्रतिकार केल्यामुळे गुणफलक १७-१५ आणि थोड्याच वेळात १९-१९ असा झाला. ताय ज्यू ने सलग दोन गुणांची कमाई करीत सामना जिंकला.