सेरेना, हॅलेप विजयी, स्टीफन्स बाहेर
   दिनांक :09-Mar-2019
इंडियन वेल्स : सेरेना विल्यम्सने व्हिक्टोरिया अझारेंकाला अवघ्या दोन तासात 7-5, 6-3 असे पराभूत करून बीएनपी पॅरिबस ओपन टेनिस स्पर्धेच्या दुसर्‍या फेरीत प्रवेश केला. या दोन्ही खेळाडूंनी बाळंतपणाच्या सुट्टीनंतर या स्पर्धेत पुनरागमन केले. दुसरी सीड सिमोना हॅलेपने बारबोरा स्ट्रायकोव्हावर 6-2, 6-4 अशी मात केली.
 

 
 
बारावी सीड अश्लेघ बार्टी, 20 वी सीड गार्बिन मुगुरूझा, 22 वी सीड येलेना ओस्टापेन्को व 18 वी सीड क्वियांग वांग या सीडेड खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर विजय नोंदविला, मात्र चौथी सीड अमेरिकेच्या स्लोएन स्टीफन्सला अवघ्या एका तासात स्वीत्झर्लण्डच्या स्टीफनी व्होएगेलेकडून 6-3, 6-0 असा पराभव पत्करावा लागला. तसेच 14 वी सीड दारिया कसात्किनाला मार्केटा व्होंड्रॉउस्काकडून 6-2, 6-1 असा, तर 19 वी सीड कॅरोलिना गार्सियाला जेनिफर ब‘ॅडीकडून 6-3, 3-6, 6-0 असा पराभव पत्करावा लागला.
 
तत्पूर्वी, माजी प्रथम विश्वमानांकित व्हिनस विल्यम्सने जर्मनीच्या आंद्रे पेत्कोविक हिची कडवी झुंज 6-4, 0-6, 6-3 अशी मोडून काढली. आता व्हिनसचा सामना माजी प्रथम विश्वमानांकित व्हिक्टोरिया अझारेंकाशी होणार आहे.
पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीच्या सामन्यात स्टॅन वावरिंकाने डॅनियल इव्हान्सवर 6-7 (4), 6-3, 6-3 अशी, तर स्टीव्हन जॉन्सनने त्याचाच अमेरिकन मित्र टेलर फि‘ट्‌झवर 6-3, 6-3 अशी मात केली. अमेरिकेच्या सॅम क्वेरीने इटालीच्या मॅतिओ बेरेट्टिनीवर 7-6 (7/5), 2-6, 6-4 असा विजय नोंदविला. आता सॅमचा सामना 13 वा सीड कॅनडाच्या मिलोस राओनिकशी होणार आहे. अनुभवी इव्हो कार्लोव्हिकने ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू एबडेनला 7-6 (7/3), 7-6 (7/3) अशी मात दिली. आता इव्होचा सामना 11 वा सीड बोर्ना कोरिकशी होणार आहे. कॅनडाच्या 18 वर्षीय फेलिक्स अगर अॅलिसिमने बि‘टनच्या कॅमरून नूरीवर 6-3, 6-2 अशी मात करून पुढील फेरी गाठली असून 58 वा विश्वमानांकित फेलिक्सची गाठ ग‘ीसचा स्टार खेळाडू स्टीफनोस तसितसिपासशी पडणार आहे.