शाळांच्या मालमत्ता कराचा प्रश्न सोडवावा - शैलेश जोशी
   दिनांक :09-Mar-2019
अकोला: ‘एज्युकेशन हब’ म्हणून ओळखल्या जात असलेल्या अकोला शहरातील महापालिका हद्दीतील शाळांकडून मोठ्या प्रमाणात मालमत्ता कर आकारला जातो. अनेक शाळा विद्यार्थ्यांकडून डोनेशन न घेता ज्ञानदानाचे कार्य करीत आहे,पण यात शाळा मात्र कराच्या ओझ्याखाली दबत आहेत. त्यांना या जोखडातून मुक्त करा व त्यासाठी अकोला शहराचे महापौर, लोकप्रतिनिधी यांच्याशी त्वरित चर्चा करून यातून मार्ग काढावा अशी मागणी विद्या भारतीचे संघटन मंत्री शैलेश जोशी यांनी स्थायी समितीचे सभापती विनोद मापारी यांना भेटून केली.
 

 
 
शैक्षणिक संस्थांना महापालिकेकडून अक्षरशः वेठीस धरले जाते. शाळांचा मालमत्ता कर हा व्यावसायिक दराने आकारला जात असल्याने शहरातील शाळांना त्याचा मोठा फटका बसला आहे. विशेषतः मराठी माध्यमांच्या शाळा कराच्या ओझ्याखाली पूर्णपणे दबल्या आहेत. या शाळांना दरवर्षी कराचा भरणा करणे अडचणीचे होते आहे असे शैलेष जोशी म्हणाले.
तर हा प्रश्न अत्यंत गंभीर असून त्यावर लवकरच तोडगा काढू असे आश्वासन सभापती विनोद मापारी यांनी दिले आहे.
याप्रसंगी विद्या भारतीचे क्षेत्रीय संपर्क प्रमुख श्रीकांत देशपांडे, पश्चिम विदर्भ प्रमुख समीर थोडगे, जिल्हाप्रमुख शरद वाघ व अन्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.