माझी जिवंत राहण्याची शक्यता फक्त ३० टक्केच होती- सोनाली
   दिनांक :09-Mar-2019

कर्करोगावर मात करणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली बेंद्रेने आजारपणातील कटु अनुभव शेअर केला आहे. कर्करोग झाल्यानंतर माझी जिवंत राहण्याची फक्त ३० टक्केच शक्यता असल्याचे डॉक्टरांनी सांगितल्याचे सोनाली म्हणाली. सोनालीने नुकतीच एका माध्यमाला मुलाखत दिली असून या मुलाखतीमध्ये तिने कॅन्सरचं निदान ते तिच्यावर करण्यात आलेल्या सर्जरीपर्यंतच्या प्रवासाचे अनुभव शेअर केले आहेत.

 
 
 

जुलै २०१८ मध्ये सोनालीला चौथ्या स्टेजचा हाय ग्रेड कॅन्सर झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर बॉलिवूडला धक्का बसला होता. न्यूयार्कमध्ये उपचार घेणाऱ्या सोनालीची भेट घेऊन बॉलिवूडमधील काही कलाकारांनी तिला धीर दिला होता. सोनालीने ज्यापद्धतीने कर्करागावर मात केली ते इतरांसाठी प्रेणादायीच आहे. कॅन्सरचं निदान झाल्यानंतर मला काही सर्जरी कराव्या लागणार होत्या. मात्र सर्जरीच्या वेळी माझ्या मनावर प्रचंड दडपण आलं होतं. या सर्जरीनंतर मी माझ्या कुटुंबाला, माझ्या मुलाला पाहू शकेल की नाही, या विचाराने मनात काहुर माजलं होते, असे सोनाली म्हणाली.

  

जवळच्या लोकांना सोडून मला न्यूयार्कला जायची इच्छा नव्हती. मात्र, पतीने माझ्या मनाविरूद्ध तिथे नेहण्याचा प्रयत्न केला. घर सोडून मला न्यूयार्कला जायचे नव्हते, तू असे का करतो म्हणून मी पतीला भांडलेही. भारतामध्ये चांगले डॉक्टर असताना का तिकडे जायचे? माझं घर आणि माझी लाईफ आहे असेही मी पतीला ठणकावले. मात्र, तीन दिवसांमध्ये आम्ही सामान बांधून न्यूयार्कला रवाना झालो. न्यूयार्कला पोहचल्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही डॉक्टरांकडे गेलो. त्यांनी माझ्या सर्व चाचण्या केल्यानंतर माझी जिवंत राहण्याची शक्यता फक्त ३० टक्केच असल्याचे त्यांनी सांगितले. काही दिवसांमध्येच उपचार सुरू झाले. सुदैवाने मी मृत्युच्या दारातून जिवंत परतले. पण एक मात्र खरं या जगात आजही माणुसकी आहे हे मला कॅन्सरमुळे समजलं. याकाळात मला खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या. असे सोनाली म्हणाली.

 

भारतात परतल्यानंतर सोनालीने कॅन्सरचं निदान ते तिच्यावर करण्यात आलेल्या सर्जरीपर्यंतच्या प्रवासाचे अनुभव शेअर केले होते. त्यानंतर तिने एक फोटोशूट करुन आपल्या सर्जरीची जखम दाखविली आहे. कॅन्सरसारख्या आजाराला मोठ्या धैर्याने सामोरं जाणाऱ्या सोनालीने नुकतंच एक फोटोशूट केलं आहे. त्यामुळे सध्या ती चांगलीच चर्चेत आली आहे. सोनालीने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर करत ऑपरेशनच्या खूणा दाखविल्या आहेत. कॅन्सरवर उपचार सुरु असताना सोनालीवर काही शस्त्रक्रिया करण्यात आल्या. या शस्त्रक्रियांचं व्रण अजूनही तिच्या शरीरावर असून शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने शस्त्रक्रियेमुळे निर्माण झालेला २० इंचाचा कट दाखविला आहे.