अभिनंदन आमचे आदर्श; लष्करात दाखल होण्यासाठी हजारो काश्मिरी तरुण रांगेत
   दिनांक :09-Mar-2019
 विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी दाखवलेले शौर्य आणि एकूणच भारतीय लष्कराने केलेल्या एयर स्ट्राईकचे सकारात्मक परिणाम जम्मू-काश्मीरमध्ये पाहायला मिळत आहेत. ज्या खोऱ्यात प्रामुख्याने भारतविरोधी कारवाया पाहायला मिळतात, तिथे देशप्रेमाचा सूर ऐकू येऊ लागला आहे. अभिनंदन वर्धमान हे तर काश्मिरी तरुणांचे आदर्शच झालेत. त्यांच्यासारखा पराक्रम करण्यासाठी आम्हाला लष्करात दाखल व्हायचंय, असे म्हणत दोन हजारांहून अधिक तरुण आज जम्मूतील डोडा स्पोर्ट्स स्टेडियममध्ये सैन्य भरतीसाठी पोहोचले.

 
 
देशाची आणि माझ्या कुटुंबाची सेवा करण्यासाठी भारतीय लष्करात सहभागी व्हायची इच्छा मुबस्सीर अली या तरुणाने बोलून दाखवली. विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्याबद्दल तरुणाईमध्ये आदराची भावना पाहायला मिळाली. पाकिस्तानच्या छळाला न जुमानता अभिनंदन यांनी ज्या धीराने, जिद्दीने परिस्थितीचा सामना केला आणि मायदेशात परतले, त्या धाडसाला तरुणाई सलाम करतेय. त्यांचे शौर्य पाहूनच लष्करात येण्याची प्रेरणा मिळाल्याचे अनेकांनी प्रांजळपणे सांगितले.
 
 
 
बारामुल्ला इथेही सैन्य भरतीसाठी हजारो तरुण रांगेत दिसले होते. त्यांच्यातील ही देशप्रेमाची ज्योत तेवत ठेवणे ही प्रत्येकाचीच जबाबदारी आहे.