प्राचीन काळापासूनची ओढ!
   दिनांक :01-Apr-2019
फिरारे इंटरनॅशनल 
 
नीलेश जठार
९८२३२१८८३३
 
नद्या, समुद्र, सरोवरे, जलाशय यांची ओढ मानवाला प्राचीन काळापासून आहे. नव्हे, पाणी याला दुसरे नाव मुळी जीवन असेच आहे. म्हणजे पृथ्वीतलावरचा कोणताही माणूस पाण्याशिवाय जगू शकत नाही. म्हणून तर माणसाला पाण्याची ओढ अधिक असते. त्यातूनच जीवनदायिनी नद्या, सरोवरांचा मानवी जीवनात पूजेचे स्थान मिळालेले दिसते. जगभरात किती सरोवरे, नद्या असतील, याची गणती करणे अवघड असेल. यातील अनेक सरोवरे, नद्या अतिशय सुंदरही आहेत. मात्र यातील अनेक सुंदर जलाशय माणसासाठी जीवघेणे आहेत. त्यांची ही माहिती-
 
‘डोमिनिका’ या कॅरेबियन देशातील डोमिनिका सरोवर बॉयिंलग लेक म्हणजे उकळते सरोवर म्हणून जगप्रसिद्ध आहे. हे सरोवर खूपच धोकादायक आहे. या सरोवराचे तापमान 194 अंशांपर्यंत असते. म्हणजे चुकून कुणी यात पडला तर तो शिजूनच बाहेर निघणार. त्याचप्रमाणे स्पेनमधील ‘रिओ टिटो’ हे सरोवर दुरून पाहिले तर त्यात उतरावे असा मोह कुणालाही होऊ शकेल. मात्र या सरोवरच्या पाण्यात ॲसिडची मात्रा खूप मोठ्या प्रमाणात आहे. नासातील वैज्ञानिकांनी या सरोवरातील पाण्याची तपासणी केली तेव्हा असे दिसले की या पाण्याचे तापमान मंगळ ग्रहाएवढे आहे.
 
 
 
टांझानियातील लेक ‘नेट्रॉन’ गुलाबी सरोवर म्हणून प्रसिद्ध आहे. या सरोवरातील पाण्यात मीठ व सोडा यांचे प्रमाण खूप आहे. या पाण्याचे तापमानही 140 अंशापर्यंत असते. म्हणजेच येथेही पाण्याला स्पर्श करणे जीवावर बेतू शकते. मोंटानियातील बर्कली पिट या सरोवराचे पाणी असिडीक असून यात अनेक रसायने मिसळलेली आहेत. असे सांगतात की खूप पूर्वी या सरोवरचे पाणी पिण्यासाठी वापरले जात होते मात्र नंतर हे पाणी अधिकाधिक खराब होत गेले व आता ते वापरण्यायोग्य नाही.
 
कॅलिफोनिर्यातील ‘मानोलेक’ या सरोवरातही मीठ व सोडा यांचे प्रमाण जास्त आहे. हे पाणी पाहायला एकदम स्वच्छ दिसते मात्र ते अतिशय जड आहे. त्येात कार्बोनेट जादा असल्याने त्याची पीएच व्हॅल्यू 10 इतकी प्रचंड आहे. कॅमेरूनमधील ‘लेक न्यॉस’ हे ज्वालामुखी सरोवर आहे. या पाण्यात कार्बन डाय ऑक्साईडची मात्रा अधिक आहे. असे सांगतात की 1986 नंतर या सरोवराच्या सानिध्यात राहणारे 1700 नागरिक रात्री जे झोपले ते पुन्हा उठलेच नाहीत. सफोकेशनमुळे म्हणजेच गुदमरल्यामुळे या सर्वांच्या जीवनाचा अंत झाला होता.
 
 
 
इंडोनेशियातील ‘सितराम’ नदी जगातील सर्वाधिक प्रदूषित नदी असल्याचे सांगितले जाते. या नदीच्या पाण्यात शिसे, कॅडमियम, क्रोमियम हे धोकादायक धातू आहेत तसेच पेस्टीसाईडचे प्रमाणही अधिक आहे. हे पाणी पिणे म्हणजे मरणाला आमंत्रण देण्यासारखे आहे. रशियातील कराकाय लेक हे पाणी असेच जहरीले आहे. हे पाणी रेडिओॲक्टिव्ह आहे. म्हणजेच यातून रेडिएशन होते जे माणसासाठी अतिशय धोकादायक असते.