भगदाडं बुजविण्याची मोहीम!
   दिनांक :01-Apr-2019
 
 

ही तो रश्रींची इच्छा!
र. श्री. फडनाईक
शेवटी कॉंग्रेसवर ‘व्हिप’ काढण्याची पाळी आली. आता या निर्वाणीच्या आदेशालाही कोणी जुमानले नाही, तर त्याच्यावर कोणती सुप्रीम कारवाई करणार, याचा त्या पक्षाने तपशील दिला नसला, तरी अवज्ञा करणार्‍याच्या कानशिलात लगावण्यापर्यंत ही शिक्षा जाऊ शकते, असा कयास बांधायला जागा आहे; ‘स्पीच लँग्वेज’वरून तसेच दिसते!
झाले काय, की कॉंग्रेसनेते जेव्हा गठ्ठ्यागठ्ठ्याने भाजपाच्या खेम्यात जाऊ लागले, तेव्हा त्याची दखल घेणे श्रेष्ठींना भाग पडले. महाराष्ट्र याबाबत अग्रेसर असल्याचे पाहून कॉंग्रेसच्या मुख्यालयातून एका कडक शिस्तीच्या हेडमास्तरला मुंबईत पाठविण्यात आले; छडी घेऊन पाठविण्यात आले. कसा आहे हा मास्तर :
या मास्तराच्या हाती गुलाबाचे फूल ठेवले, अन्‌ त्याला सांगितले, की ‘जा, समोरच्या मतदाराला आळव; म्हण, ‘आय लव्ह यू’, तर ते एक वाक्य सुद्धा, हा छडीवाला इतक्या कंटाळवाण्या पद्धतीने म्हणेल, की समोरच्या व्यक्तीने धाडकन दरवाजा बंद नाही केला तरच नवल!

तर हे हेडमास्तर परवा मुंबईत हजर झाले. प्रदेश कॉंग्रेसने त्याप्रीत्यर्थ बैठक आयोजित केली. शनिवारी, म्हणजे 30 मार्च रोजी ही जंगी बैठक झाली. बैठक जंगी होती, तरी त्यात खडाजंगी मात्र झाली नाही! बैठक कशी झाली असेल याची आम्ही कल्पना केली. त्यांच्या विलापाचा आमचा कल्पनाविलास असा :
राज्यात अनेक ठिकाणी कॉंग्रेसमध्ये गळती लागल्याचे कळल्यावरून, ती गळती थांबविण्याचे सोल्युशन घेऊन दिल्लीहून मान्यवर आले आहेत, असे आयोजकांनी प्रारंभीच स्पष्ट केले. बैठकीत मोठे मोठे नेते उपस्थित होते. हेडमास्तर आपल्याकडेच संशयाने पाहत आहेत, असे प्रत्येकाला वाटत होते! शेवटी या नेत्यांनी खाली मान घालून बसणे पसंत केले! हेडमास्तर सोबत आणखी दोन मास्तर दिल्लीहून आले होते! ते बहुधा पी. टी. आय. असावेत! सारखे ऑर्डर सोडत होते : नीट बसा, समोर लक्ष द्या; तो कोण तिथे चुळबूळ करतो आहे; उभा राहा... वगैरे!
हेडमास्तरला वाटले आपल्यालाच उभे राहायला सांगितले! ते उभे झाले, तसे सारे सभागृह शांत झाले! हेडमास्तर आधी खाकरले, मग शिंकारले, त्यानंतर गरजले; म्हणाले, पक्षासाठी हा काळ संघर्षाचा आहे. या काळात कोणी काळेबेरे करू नये! सार्‍यांनी फक्त पक्षासाठी काम करावे! स्वत:च्या पक्षासाठी! भाजपाचा पराभव करण्यासाठी एकजूट ठेवायची! छत्तीसच्या आकड्याचे त्रेसष्टच्या अंकात रूपांतर करायचे! पक्षात राहायचे अन्‌ पक्षाशी बेईमानी करायची, हे यापुढे खपवून घेतले जाणार नाही. लक्षात घ्या, हा आदर्श नेत्यांचा पक्ष आहे. आपल्याला आदर्श वसाहत उभी करायची आहे! तिकडे, आपल्या सर्वोच्च नेत्याचे संपूर्ण कुटुंब देश वाचविण्यासाठी दिवसरात्र खपत असताना, पक्षातील काही जण पक्षाला सुरुंग लावण्याचा प्रयत्न करीत आहेत, ही गोष्ट अत्यंत लांच्छनास्पद आहे. जो पक्षाशी गद्दारी करेल, त्याची यापुढे खैर नाही, हे ध्यानात घ्या. मतभेद असतील तर ते मिटवा! दर निवडणुकीत पक्षाला तेच तेच सांगण्याची गरज पडावी, हे कशाचे लक्षण समजायचे! शिस्त शिका! त्यासाठी काही दिवस शिस्त शिकविणार्‍या कोणत्याही संस्थेत जाण्याची तुम्हाला मोकळीक आहे! पण तिथला तुमचा मुक्काम टेम्पररीच राहू द्या! घटनेच्या अनुच्छेद 370 प्रमाणे तात्पुरता नाही, खर्‍या अर्थाने तात्पुरता! तेव्हा, झाले ते खूप झाले! ही गळती आता थांबलीच पाहिजे! आधीच आपला (थिंक) टँक आटत आला आहे. ‘चुल्लूभर पानी’ तरी शिल्लक राहिलेच पाहिजे! त्याशिवाय मुक्ती मिळणार नाही! भाजपापासून मुक्ती, असे मला म्हणायचे आहे...!
हेडमास्तरचे जोशपूर्ण भाषण झाले. पक्ष सोडून जाणार्‍यांची यादी आयोजक वाचून दाखविणार होते, पण ‘सध्या ती अपूर्ण यादी वाचू नका, त्यात आणखी अनेकांचा समावेश होऊ शकतो’, असे सांगून हेडमास्तरांनी ती लांबच्या लांब यादी वाचू दिली नसावी, अशीही आमची कल्पना आहे.
सारांश हाच, की पक्षाला पडलेली भगदाडं बुजविण्याचे काम या प्रमुख पक्षाने हाती घेतलेले दिसते! पण त्यासाठी नेमावयाचे गवंडी पारखून आणि पडताळून घ्यावे लागतील अन्यथा भगदाडं आणखी विस्तीर्ण व्हायचे!