पवारांची संशोधनमालिका
   दिनांक :01-Apr-2019
 
 
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी संरक्षणमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सध्या मुक्ताफळे उधळत आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, पंतप्रधान मोदींच्या हातात देश सुरक्षित नाही! केवढे प्रचंड हे संशोधन. सध्या त्यांना आपला पक्ष सांभाळता सांभाळता नाकी नऊ आल्याने फावल्या वेळात त्यांनी संशोधन करण्याचा नवा उद्योग सुरू केला असावा, असे म्हणण्यास बरीच जागा आहे. तर त्यांनी वरील संशोधन केले. मानसोपचार विज्ञानात अगदी नोबेल पारितोषिक मिळविण्यासाठी आवश्यक असे हे संशोधन. पवारसाहेब अनेक विषयांवर संशोधन करीत असतात आणि आपले निष्कर्ष जाहीर करीत असतात. पण, अनेकदा ते त्यांच्याच अंगलट आले तरीही. तर पवार म्हणाले, राफेल प्रकरणात मोदींनी अंबानींना 30 हजार कोटींचा लाभ करून दिला. आता या संशोधनात दोन व्यक्ती आहेत. तसेही अनेकदा नोबेल विभागून देण्यात आले आहेच. त्यातील पहिला संशोधक आहे राहुल गांधी. मोदींविरोधात मुद्देच नसल्याने त्यांनी राफेलचा मुद्दा पुढे केला. पण, पुरावे? शून्य. ते पुरावे पवारांजवळ असतीलच. कारण, ते तर देशाचे संरक्षणमंत्री राहिले आहेत. त्यांच्या कार्यकाळात जी शस्त्रास्त्र खरेदी झाली, त्यात कुणाला किती दलाली दिली गेली याचेही एकदा संशोधन पवारांनी केले पाहिजे आणि त्याचे निष्कर्ष जनतेसमोर ठेवले पाहिजे. आहे का हिंमत? सर्वात आश्चर्य याच गोष्टीचे वाटते की, पवारांना राहुलची लाईन का घ्यावीशी वाटली? थोडे मागे वळून बघितले तर याच पवारांनी राफेल मुद्यावर असे भाष्य केले होते की, राफेल प्रकरणी घोटाळा झाला, यावर देशातील जनतेचा विश्वास नाही. अचूक संशोधन. आता त्या संशोधनात त्यांनी संशोधन केले असावे. कारण, जुने विधान त्यांच्या फायद्याचे नसावे. आघाडीधर्म पाळायचा आहे ना. त्यात कॉंग्रेसची नाराजी नको. पण, पवारांना हेही उमगले असेलच की, हेलिकॉप्टर घोटाळ्यातील आरोपींना सध्या मोदींनीच पकडून आणले आहे आणि काहींनी तर माफीचा साक्षीदार होण्यापर्यंत तयारी दर्शविली आहे. यावरही एकदाचे संशोधन होऊन जाऊ द्या.
 

 
 
 
पवारांचा दुसरा मुद्दा आहे, शेतकर्‍यांच्या आत्महत्या. स्वत: दहा वर्षे केंद्रात कृषी मंत्री असताना, पवारांना आत्महत्या रोखता आल्या नाहीत. त्यांना भेटण्याचीही त्यांना सवड मिळाली नाही. पवार स्वत:ला शेतकर्‍याचा पुत्र म्हणवतात. हेच का शेतकरीप्रेम? विदर्भातील सर्वाधिक आत्महत्या करण्यामागे पवारच कारणीभूत आहेत, हे विदर्भ-मराठवाड्यातील शेतकरी अजून विसरलेले नाहीत. त्याकाळी साध्या युरियाची मागणी करणार्‍या शेतकर्‍यांवर गोळ्या कुणी चालविल्या होत्या, याचे स्मरण करून बघा. शेतकर्‍यांना देशोधडीला लावण्याचे काम या नतद्रष्ट कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केले. जरा नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचा अहवाल पाहा. त्यात कोणत्या वर्षी आत्महत्या सुरू झाल्या, त्या किती झाल्या, त्या कुणाच्या कार्यकाळात वाढत गेल्या याचा संपूर्ण लेखाजोखा आहे. वरून पवारांची मखलाशी अशी की, आम्ही शेतकर्‍यांचे अश्रू पुसले होते. शेतकरी आत्महत्या थांबविण्याचे प्रयत्न केले. बहोत खुब पवारसाहेब. सौ चुहे खा के बिल्ली हज को चली... इतका खोटेपणा निदान पवारांकडून तरी व्हायला नको होता. पण, करणार काय? पुढे निवडणुका आहेत. मोदींवर टीका करायची म्हणून काही मुद्दे हवेत ना. या एकाच मुद्यावर तर सारे विरोधी, गुन्हेगार, भारत तेरे टुकडे होंगे म्हणणारे, नक्षलवादी समर्थक कॉंग्रेस एकत्र आले आहेत ना. हे जनतेला दिसत नाही का? मोदींनी शेतकर्‍यांचे जीवनमान उंचावण्यासाठी अनेक योजना आणल्या. भरघोस प्रमाणात युरिया उपलब्ध करून दिला. गैरवापर होऊ नये म्हणून निमकोटेड युरिया आणला. युरियापोटी शेतकर्‍यांना 75 हजार कोटींची सबसिडी दिली. आज दिसते का पवारांना युरियाची ओरड?
 
शेतकर्‍यांसाठी अल्प व्याजदरात दहा लाख कोटी उबलब्ध करून दिेले. शेतोपयोगी वस्तूंवर सबसिडी दिली. महाराष्ट्रात जलयुक्त शिवारासाठी सबसिडी दिली. सिंचनाचे प्रकल्प मार्गी लावले. मुंह मे आया बक दिया, सारखे पवारांनी तरी बोलू नये.
 
तुमच्या काळात तुमच्याच पुतण्यांनी 70 हजार कोटी रुपये खर्च केले. पण, एक टक्काही सिंचन झाले नाही. याची साद्यंत कहाणी पृथ्वीराज चव्हाण यांना विचाराना जरा. जेथे गेेले तेथे पैसे खाल्ले. शेतकर्‍यांना हे माहीत नाही का? म्हणे नोटाबंदीच्या काळात 15 लाख नोकर्‍या गेल्या. आल्या किती हेही पवारांनी सांगावे. गरज पडल्यास आकडेमोड तज्ञ आणि एअरसेल-मॅक्सिस घोटाळा फेम पी. चिदंबरम्‌ यांना विचारा. नाही तर विरोधकांचे सरकार आल्यानंतर वित्तमंत्र्याचे बाशिंग बांधून तयार असलेल्या त्या दिवट्या रघुराम राजनला विचारा. आणखी एक. पवारसाहेब, एकीकडे शेतकरी आत्महत्या करीत असताना, तुमच्या कन्या सुप्रिया सुळे या अवघ्या 9 एकरात 12 कोटींचे उत्पन्न घेतात. यामागील गुपित जरा लोकांना सांगा ना. वास्तविक पाहता सुप्रिया सुळे यांना देशातील नव्हे, जगातील सर्वाधिक प्रगतीशील महिला कास्तकार म्हणून पुरस्कार द्यायला हवा होता. पण, कुणाचेही लक्ष त्याकडे न जाणे हे खरंच मनाला बोचणारेच आहे. पवारांनी आणखी एक संशोधन करावे. मध्यप्रदेशात कॉंग्रेसचे सरकार आले. राहुल गांधी यांनी दोन लाख रुपये कर्जमुक्ती घोषित केली. किती शेतकर्‍यांना मिळाला लाभ? फक्त मोजक्या. 50 हजार वाटायचे होते. वाटले फक्त एक हजार कोटी. कमलनाथ सरकार येऊन आतापर्यंतच्या कालावधीत मध्यप्रदेशात 160 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. आपणास तर हे माहीत असेलच. कारण, आपण तर देशाचे कृषी मंत्री होते. आणखी काही संशोधन पवारांनी केले. ते म्हणाले, पुलवामा हल्ल्यानंतर जो एअर स्ट्राईक केला गेला तेव्हा सारा देश एकजुटीने लष्कराच्या पाठीशी उभा राहिला. कुणीही राजकारण केलं नाही. मग एअर स्ट्राईकचे पुरावे मागण्याचे राजकारण कुणी केले? एकीकडे लष्कराच्या पाठीशी असल्याचे भासवायचे आणि दुसरीकडे लष्कराचा अपमान करायचा, हे पवारसाहेब तुमच्यासारख्या माजी संरक्षणमंत्र्यांना खरंच शोभलं का? पवारांनी आणखी मोठा शोध लावला. म्हणाले, अभिनंदनला पाकिस्तानने सोडले ते जगाच्या दबावामुळे. हा जागतिक दबाव कुणी निर्माण केला, हेही जरा पवारांनी या देशाला सांगितले पाहिजे. मोदींचा तिरस्कार आणि लष्कराचा अपमान कराल तर जनता तुम्हाला सोडणार नाही, हेही पवारांनी ध्यानात असू द्यावे. आज पाकिस्तानवर चोहोबाजूने जो दबाव निर्माण झाला आहे, तो मोदी आणि आमच्या परराष्ट्र व संरक्षणविषयक धोरणामुळे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पला स्वप्न पडले का की, मसूद अझहरला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित करण्याचा ठराव आणावा म्हणून आणि फ्रान्स व ब्रिटनने त्याचे समर्थन करावे म्हणून. जे चांगले आहे, त्याची पवार मनापासून स्तुती करतात असा जनमानसात समज होता. पण, तो समजही आता पवारांनी धुळीस मिळविला आहे. पवारसाहेब, एक लक्षात घ्या. आज मोदींविरुद्ध ज्या खालच्या पातळीवरचे राजकारण सुरू आहे, त्या पापाचे भागीदार तुम्ही तरी बनू नका. अन्यथा आज जी तुमची देशात एक सुजाण नेता म्हणून ख्याती आहे, ती प्रतिष्ठाही तुम्ही गमावून बसाल. बूंदसे गई वो हौदसे नही आती पवारसाहेब...