काँग्रेसला धक्का; अल्पेश ठाकोर यांनी सोडला पक्ष
   दिनांक :10-Apr-2019
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर गुजरातमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. गुजरातमधील ओबीसी समाजाचे नेते अल्पेश ठाकोर यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. अल्पेश ठाकोरचे जवळचे सहकारी धवलसिंह झाला यांनी एका वृत्तपत्राला ही माहिती दिली.
 
ठाकोर सेना समितीने एक ठराव मंजूर केला असून त्यांनी मला, अल्पेश आणि भरतजी ठाकोर आम्हा तिघांना काँग्रेस सोडण्यास सांगितले आहे. हे तिघेही काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत. ठाकोर समाजाच्या मागण्यांकडे पक्षाकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्यामुळे ठाकोर सेना समितीने हा ठराव मंजूर केला आहे. सध्या तरी कुठल्याही अन्य पक्षात प्रवेश करण्याचा विचार नाही असे धवलसिंह झाला यांनी सांगितले.
महिन्याभरापूर्वी अल्पेश ठाकोरने भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार असल्याच्या वृत्ताचे खंडन केले होते. त्यावेळी अल्पेश ठाकोर यांनी पक्षनेतृत्वावर नाराज असल्याची कबुली दिली होती. मी माझ्या लोकांसाठी लढत राहणार. मी काँग्रेसमध्येच राहून काँग्रेसला पाठिंबा देणार. सत्ता प्रत्येकाला आवडते. मी सुद्धा मंत्रिपदाबाबत गंभीर आहे. मंत्रिपद मिळाल्यास मला सुद्धा अडचणींचा सामना करणाऱ्या माझ्या लोकांची सेवा करता येईल असे अल्पेश ठाकोर यांनी त्यावेळी म्हटले होते.