भंडारा-गोंदियात एकूण १४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
   दिनांक :10-Apr-2019
- 18 लाख 8 हजार 948 मतदार
भंडारा-गोंदिया लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आज गुरुवार 11 एप्रिल 2019 रोजी मतदान होणार असून याकरिता प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. प्रमुख राजकीय पक्षासह 14 उमेदवार रिंगणात आहेत. सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजता पर्यंत मतदानाची वेळ असून सर्व सहा विधानसभा मतदार संघातील 2184 मतदान केंद्रावर 18 लाख 8 हजार 948 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यात 9 लाख 5 हजार 490 पुरुष व 9 लाख 3 हजार 458 स्त्री मतदारांचा समावेश आहे. गोंदिया जिल्हयातील अर्जूनी विधानसभा मतदार संघातील 317 मतदान केंद्रावर मतदानाची वेळ सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत असणार आहे. 
 
 
मतदानासाठी नियुक्ती अधिकारी, कमचारी यांचे पथक बुधवारी रवाना करण्यात आले. गुरुवार 11 एप्रिल रोजी होणाèया मतदानात भंडारा-गोंदिया जिल्हयातील 18 लाख 8 हजार 948 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. 2184 मतदान केंद्रावर हे मतदान होणार असून यासाठी 3644 बॅलेट युनिट, 2671 कंट्रोल युनिट व 2909 व्हीव्हीपॅट वापरले जाणार आहेत.
 
भंडारा जिल्हयात 1211 मतदान केंद्रावर केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी म्हणून 6260 अधिकारी कर्मचारी तर गोंदिया जिल्हयासाठी 973 मतदान केंद्रावर केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी असे मिळून 4279 अधिकारी कर्मचारी नेमण्यात आले आहेत. निवडणुकीच्या कामासाठी सर्व सहाही विधानसभा मतदार संघात 13 हजार 292 पोलिस अधिकारी, कर्मचारी तैनात असणार आहेत.
 
11 एप्रिल रोजी मतदानासाठी सुट्टी जाहिर करण्यात आली असून आठवडी बाजार बंद ठेवण्यात येणार आहेत. सुट्टी ही मतदान करण्यासाठी असून आपल्या मतदानाचा हक्क बजावल्यानंतरच अन्य कामासाठी जावे, असे प्रशासनाचे आवाहन आहे. सर्व मतदारांनी शांततेत मतदान करावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी शांतनू गोयल, गोंदियाचे जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे, भंडारा जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे, गोंदिया जिल्हा पोलिस अधीक्षक विनीता साहू यांनी केले आहे.