‘द ताश्कंद फाइल्स’चे प्रदर्शन रोखण्यासाठी एका बड्या कुटुंबाचा दबाव'
   दिनांक :10-Apr-2019
मुंबई:
भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या मृत्यूवरील प्रश्नांवर ‘द ताश्कंद फाइल्स’ हा चित्रपट 12 एप्रिलला प्रदर्शित होत आहे. मात्र, या चित्रपटाचे प्रदर्शन रोखण्यासाठी काँग्रेसमधील काही बडे नेते आपल्यावर दबाव टाकत असल्याचा आरोप चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीने केला आहे.
 
 
‘द ताश्कंद फाइल्स’ चित्रपटाच्या निर्मात्यांना प्रदर्शन थांबवण्यासाठी कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली. ही नोटीस शास्त्री कुटुंबीयांकडून पाठवण्यात आली असली, तरी काँग्रेस पक्षामधील एक मोठे कुटुंब शास्त्री कुटुंबीयांच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवत असल्याचा आरोप विवेक अग्निहोत्री यांनी केला आहे. या चित्रपटाची भीती काँग्रेसमधल्या नेत्यांना वाटते. त्यामुळे शास्त्री कुटुंबीयांना पुढे करून ते चित्रपटाचे प्रदर्शन थांबवू पाहत आहे. मला सोशल मीडियाच्या माध्यमातून धमकावले जात असून, मी या प्रकरणी महाराष्ट्र सरकारची मदत घेतली आहे. लाल बहादूर शास्त्री यांचे नातू आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विभाकर शास्त्री यांनी चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करत मला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. या चित्रपटात जे काही दाखवले आहे ते खोटे असल्याचा त्यांचा दावा आहे. काँग्रेसमधल्या एका बड्या कुटुंबाने विभाकर यांच्यावर चित्रपटाचे प्रदर्शन थांबवण्यासाठी दबाव टाकला असल्याचे त्यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.