इस्रायलमध्ये पुन्हा नेतान्याहू यांच्या सरकारची शक्यता
   दिनांक :10-Apr-2019
जेरुसलेम:
इस्रायलमध्ये पुन्हा एकदा बेंजामिन नेतान्याहू यांचेच सरकार येणार, हे आता जवळपास स्पष्ट झाले आहे. इस्रायलच्या सार्वत्रिक निवडणुकीत बेंजामिन नेतान्याहू यांनी विजय मिळवला आहे. इस्रायलचे पंतप्रधानपद भूषवण्याची त्यांची ही विक्रमी पाचवी वेळ ठरणार आहे.

 
हे वृत्त लिहीत असताना ९७ टक्के मतांची मोजणी झालेली होती आणि कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नव्हते. मात्र, नेतान्याहू मजबूत स्थितीत असून त्यांना पाठिंबा देणार्‍या अन्य पक्षांची मोट बांधून ते सरकार स्थापन करू शकतात, असे कळते.
जागतिक राजकारणात बेंजामिन नेतान्याहू हे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जवळचे मित्र समजले जातात. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाला त्यावेळी इस्रायलने भारताला लागेल ती मदत करण्याची तयारी दाखवली होती.
 
नेतान्याहू यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप झाले. त्यामुळे बेंजामिन नेतान्याहू यांच्यासाठी ही निवडणूक अतिशय महत्त्वाची होती. लाचखोरीच्या तीन प्रकरणात त्यांच्यावर आरोपपत्रही दाखल होऊ शकते. आपण काहीही गैर केलेले नाही, असा नेतान्याहू यांचा दावा आहे. बेंजामिन नेतान्याहू यांच्या लीकुड आणि विरोधात असलेल्या गांटेझ यांच्या सेंट्रीस्ट ब्ल्यू पक्षाला समसमान ३५ जागा मिळाल्या आहेत. पण नेतान्याहू अन्य पक्षांच्या मदतीने सरकार बनवण्याच्या स्थितीत आहेत. बेंजामिन नेतान्याहू हे इस्रायलच्या ७१ वर्षांच्या इतिहासातील सर्वाधिक काळ पंतप्रधानपद भूषवणारे व्यक्ती ठरण्याची शक्यता आहे.