लालूप्रसाद यादव यांचा जामीन अर्ज फेटाळला; सर्वोच्च न्यायालयाचा दणका
   दिनांक :10-Apr-2019
नवी दिल्ली:
 चारा घोटाळ्याप्रकरणी शिक्षा भोगत असलेले माजी केंद्रीय मंत्री लालू प्रसाद यादव यांना सर्वोच्च न्यायालयाने दणका दिला आहे. लालू यांनी जामिनासाठी केलेला अर्ज आज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावला आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे लालूंना सध्या, तरी तुरुंगातच राहावे लागणार असून, निवडणुकीमध्ये लक्ष घालण्याच्या त्यांच्या मनसुब्याला सुुरुंग लागला आहे.
 
 
 
प्रकृतीचे कारण पुढे करून लालू प्रसाद यादव यांनी जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. परंतु, न्यायालयाने हा अर्ज फेटाळून लावला. प्रकृतीचे कारण पुढे करून लालू बाहेर आल्यानंतर राजकारणात सक्रिय होतील, असे सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात सांगितल्याने त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला. सरन्यायाधीश रंजन गोगोई प्रमुख असलेल्या न्यायासनाने या जामीन अर्जावर सुनावणी केली. लालू प्रसाद यादव हे गेल्या ८ महिन्यांपासून रुग्णालयात आहेत. त्यांना रुग्णालयात राहण्यासाठी विशेष सुविधा दिली जात आहे, असे सीबीआयने न्यायासनाच्या निदर्शनास आणून दिले.
 
लालू प्रसाद यादव हे चार प्रकरणात दोषी आढळले आहेत. त्यांना १६८ महिन्यांची शिक्षा न्यायालयाने ठोठावली असून, त्यांनी आतापर्यंत केवळ २० महिन्यांची शिक्षा पूर्ण केली आहे. शिक्षेच्या तुलनेत त्यांनी १५ टक्के शिक्षाही भोगली नाही. त्यामुळे ते जामीन मिळवण्यात असमर्थ ठरतात, असे सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात सांगितले.