नरेंद्र मोदी सत्तेत आले तरच शांततेवर होऊ चर्चा होऊ शकते- इम्रान खान
   दिनांक :10-Apr-2019
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत आल्यास भारत आणि पाकिस्तानमध्ये शांततेवर चर्चा होण्याची शक्यता आहे असे म्हटले आहे. यावेळी त्यांनी सध्या विरोधी बाकावर असणारा काँग्रेस पक्ष सत्तेत आल्यास चर्चा होणं अशक्य असल्याचंही मत व्यक्त केले. राजकीय पक्षांकडून टीका होईल या भीतीने काँग्रेस शांततेवर चर्चा करणार नाही असं इम्रान खान यांनी म्हटलं आहे. 

 
 
इम्रान खान यांनी आपल्याला दोन नरेंद्र मोदी पहायला मिळणार असल्याचं म्हटले आहे. एक निवडणुकीआधीचे आणि एक निवडणुकीनंतरचे असतील असं मत त्यांनी व्यक्त केले. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, पुलवामा दहशतवादी हल्ल्यात सीआऱपीएफचे ४० जवान शहीद झाल्यानंतर भारताने पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळावंर एअर स्ट्राइक करत दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. पाकिस्तान दहशतवाद्यांना पाठिंबा देत असल्याचा आरोप पुन्हा एकदा भारताने केला होता. यानंतर पाकिस्तानने भारतीय हवाई हद्दीत घुसखोरी करत भारताचं लढाऊ विमान पाडलं होतं. यावेळी भारतीय वैमानिक अभिनंदन यांना पाकिस्तानने ताब्यात घेऊन नंतर सुटका केली होती.
या सगळ्या नाट्यमय घडामोडींनंतरही पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भाजपा पुन्हा सत्तेत आल्यास चर्चेला प्राधान्य दिलं जाईल असं म्हटलं आहे. काँग्रेस विरोधकांकडून आपण घेरले जाऊ या भीतीने आमच्यासोबत चर्चा करण्यास घाबरेल असं इम्रान खान यांनी म्हटलं आहे.
काही ठराविक प्रसारमाध्यमांशी बोलताना इम्रान खान यांनी सांगितलं की, ‘भारताने केलेल्या एअर स्ट्राइकनंतर त्यांना उत्तर देणं गरजेचं होतं. जर आम्ही उत्तर दिलं नसतं तर लोकांकडून आमच्यावर प्रचंड टीका झाली असती. जर तुम्ही उत्तर दिलं नाही तर कोणतंही सरकार पाकिस्तानात टिकू शकत नाही’.
यावेळी त्यांनी दहशतवाद संपवण्यासाठी आम्ही पुरेपूर प्रयत्न करत असल्याचं सांगितलं. एका वरिष्ठ लष्कर अधिकाऱ्याने डझनहून जास्त दहशतवाद्यांना अटक करण्यात आल्याची माहिती दिली आहे. जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरसंबंधी विचारलं असता, तो खरचं अंडरग्राऊंड झाला आहे. तो सध्या नेतृत्व करत नाही आहे असं त्यांनी सांगितले