ट्रकमध्ये आढळलेली १.९० कोटींची रक्कम जप्त
   दिनांक :10-Apr-2019
विजयवाडा:
 कृष्णा जिल्ह्यातील विजयवाडा ग्रामीण पोलिसांनी वाहनांची तपासणी करताना एका गाडीतून १.९० कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. सिमेंटची पोती घेऊन जाणाऱ्या ट्रकमध्ये पोलिसांना ही रोकड सापडल्याने खळबळ उडाली आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर ही रक्कम सापडल्याने कुठल्या पक्षाकडून आचारसंहितेचा भंग तर होत नव्हता ना, याची तपासणी पोलिसांकडून करण्यात येत आहे.
 
 
देशात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. त्यामुळे ठिकठिकाणी पोलीस आणि निवडणूक आयोगाच्या भरारी पथकांकडून चौकशी करण्यात येत आहे. तसेच संशयित वाहनांची तपासणीही केली जात आहे. आचारसंहितेचा भंग होऊ नये, यासाठी निवडणूक आयोग दक्ष आहे. तरीही, निवडणूक काळात पैशाचा गैरवापर आणि आचारसंहिता भंगाच्या घटना उघडकीस येत आहेत. पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या एक दिवस अगोदर विजयवाडा येथे पोलिसांनी एका सिमेंटने भरलेल्या ट्रकची तपासणी केली. त्यावेळी, १.९० कोटी रुपयांची रोख रक्कम आढळून आली आहे. पोलिसांनी ही रक्कम जप्त केली असून ड्रायव्हरची चौकशी करण्यात येत आहे. मात्र, मतदानाच्या एक दिवस अगोदर एवढी मोठी रोख रक्कम सापडल्याने राजकीय पुढाऱ्यांकडून मतदान प्रकियेत पैशाचा वापर होत असल्याचे दिसून येत आहे.