राहुल यांनी खोटं बोलून कोर्टाचा अवमान केला : निर्मला सीतारामन
   दिनांक :10-Apr-2019
नवी दिल्ली:
राफेलच्या मुद्द्यावरून संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. राहुल यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा पहिला परिच्छेदही वाचला नाही. हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. कोर्टाने राफेलची याचिका स्वीकारली असून कोर्टानेही 'चौकीदार चोर है' हे मान्य केल्याचे राहुल यांचे म्हणणे आहे. राहुल यांचे हे मत साफ खोटं असून राहुल यांनी खोटं बोलून कोर्टाचा अवमान केला आहे , अशा शब्दांत सीतारामन यांनी राहुल यांच्यावर हल्ला चढवला आहे.
 
 
राफेलबाबत सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आल्यानंतर राहुल गांधी यांनी कोर्टानेही 'चौकीदार चोर है' असं म्हटले होते. त्यावर सीतारामन यांनी पत्रकार परिषद घेऊन राहुल यांच्या आरोपांचे खंडन केले. राहुल गांधी स्वत: जामिनावर आहेत. राजकीय मर्यादांचे उल्लंघन करत ते देशाची दिशाभूल करत आहेत. कोर्टाने जे म्हटलंच नाही, अशा गोष्टी कोर्टाने म्हटल्याचे सांगून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत, अशी टीका सीतारामन यांनी केली.
 
 
राफेल प्रकरणी फेरविचार याचिका फेटाळण्याची केंद्र सरकारची विनंती अमान्य करत, लीक दस्तावेज वैध असून, विचाराधीन असलेल्या दस्तावेजांच्या आधारे नव्याने सुनावणी घेण्यात येईल, असा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला. हा केंद्र सरकारला मोठा झटका असल्याचे मानले जात आहे.