राहुल गांधींनी अमेठीतून दाखल केला उमेदवारी अर्ज
   दिनांक :10-Apr-2019
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केरळच्या वायनाडनंतर उत्तर प्रदेशातील अमेठीतून आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी त्यांची आई सोनिया गांधी, काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी आणि रॉबर्ट वाड्रा हेदेखील उपस्थित होते.
 
 
राहुल गांधी यंदा दोन मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवत आहेत. वायनाडमध्ये लोकसभेसाठी अर्ज दाखल केल्यानंतर आज गांधींनी अमेठीतील जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
 
 
अमेठीचे जिल्हाधिकारी कार्यालाय आज फुलांनी सुशोभित करण्यात आले होते. सकाळी साडेदहाच्या सुमारास राहुल गांधींचे अमेठीत आगमन झाले. त्यानंतर अमेठी शहरांत रोड शो करण्यात आला. या रोड शोला प्रियांका गांधी त्यांची दोन मुलं, रॉबर्ट वाड्रा आणि सोनिया गांधीही उपस्थित होत्या. या रोडशोला आलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी कमीतकमी उत्पन्न हमी योजनेचे शर्ट घातले होते. यंदा कमीतकमी उत्पन्न हमी देण्याचे आश्वासन काँग्रेसने निवडणुकांमध्ये दिलं आहे. अमेठीत जोरदार शक्तीप्रदर्शन केल्यानंतर राहुल गांधींनी उमेदवारी अर्ज दाखल केला.