कन्हैयाकुमारसाठी लोकवर्गणीतून ७0 लाख जमा
   दिनांक :11-Apr-2019
नवी दिल्ली :
 निवडणुकीचा खर्च भागविण्यासाठी अनेक उमेदवारांनी पक्षाशिवाय आॅनलाइन देणग्यांचाही आधार घेतला आहे. बिहारच्या बेुगसरायमधील भाकपचे उमेदवार कन्हैयाकुमार त्यात आघाडीवर आहेत. देशभरातील सुमारे १४ उमेदवार लोकवर्गणीतून लोकसभा निवडणूक लढवित आहेत.

 
आम आदमी पक्षाचे दिल्लीतील उमेदवार राघव चड्डा व पश्चिम बंगालच्या रायगंजमधील मोहम्मद सलीम यांचाही लोकवर्गणीवर भर आहे. नागपुरातून काँग्रेसचे नाना पटोले, हातकणंगलेमधील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, मुंबईतील तृतीयपंथीय उमेदवार स्नेहा काळे हेही लोकवर्गणी जमा करत आहेत. ते पारदर्शकता जपण्याचाही संदेश देत आहेत.
आॅनलाइन क्राउड फंडिंगचे हे तंत्र युरोपात सर्वप्रथम उपयोगात आले. मणिपूर विधानसभेच्या २0१७च्या निवडणुकीत अफस्पा कायद्याच्या विरोधात लढणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या इरोम शर्मिला यांनी साडेचार लाख रुपये जमा केले होते.
कन्हैयाकुमारला आतापर्यंत ५,५00 लोकांकडून ७0 लाख रुपये मिळाले आहेत. पूर्व दिल्लीच्या आपचे उमेदवार आतिशी मार्लेना यांच्या नावे ५0 लाख रुपयांच्या देणग्या जमा झाल्या आहेत.
राजू शेट्टी यांच्याकडे ३५ लाख रुपये जमा झाले आहेत. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे मोहम्मद सलीम यांनाही आॅनलाइन देणग्यांमधून १ लाख ४0 हजार रुपये मिळाले आहेत. आपचे पटियाळातील उमेदवार धर्मवीर व गोव्यातील एल्विस गोम्स, बसपचे एसएच बुखारी, कम्युनिस्ट पक्षाचे माले येथील उमेदवार राजू यादव हेही लोकवर्गणीवर अवलंबून आहेत.