९०७हून अधिक कलाकार भाजपच्या बाजूने
   दिनांक :11-Apr-2019
नसिरुद्दीन शाह, रत्ना पाठक शाह, कोंकणा सेन शर्मा, लिलीएट दुबे, अनुराग कश्यप, अमोल पालेकर आदींसह सुमारे ६०० कलाकारांनी 'या निवडणुकीत भाजपला मतदान करू नये', असे आवाहन केल्यानंतर आता भाजपच्या बाजूनेही काही नामवंत कलाकारांसह ९०७ मान्यवर उभे राहिले आहेत. 'देश भ्रष्टाचारमुक्त करणारे, शेतकऱ्यांचे कल्याण करणारे व विश्वात देशाची प्रतिष्ठा वाढवणारे सरकार गेल्या पाच वर्षांत आम्ही पाहिले आहे. त्यामुळे भाजपलाच मतदान करावे', असे आवाहन पं. जसराज, शंकर महादेवन, राम सुतार, अर्जुन डांगळे, वामन केंद्रे आदींनी मतदारांना केले आहे.

 
 
'नेशन फस्ट कलेक्टिव्ह' या कलाकारांच्या स्वयंसेवी संस्थेतर्फे एक पत्रक प्रसिद्ध करण्यात आले असून, त्यावर सिने कलाकार, दिग्दर्शक, गायक, वादक, चित्रकार, वास्तुविशारद अशा देशभरातील ९०७ जणांची नावे आहेत. 'कला आणि साहित्याशी जोडलेल्या आम्हा सर्वांतर्फे देशातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे. त्यांनी पूर्वग्रह न बाळगता येत्या लोकसभा निवडणुकीत मतदान करावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेत राहणे ही काळाची गरज आहे. देशासमोर दहशतवादाचे मोठे आव्हान असताना एक मजबूर नव्हे, तर मजबूत सरकार सत्तेवर राहणे गरजेचे आहे', असे या मान्यवरांनी पत्रकात म्हटले आहे. कोयना मित्रा, पायल रोहतगी, पल्लवी जोशी, योगेश सोमण, विवेक ओबेरॉय, राहुल रॉय, हरिश भिमाणी, स्मिता आपटे यांचही या ९०७ जणांमध्ये समावेश आहे.