उमेदवाराने केली ईव्हीएम मशीनची तोडफोड
   दिनांक :11-Apr-2019
इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन (ईव्हीएम) खराब झाल्याने मतदानावर परिणाम झाल्याच्या घटना अनेकदा समोर येत असतात. पण आंध्र प्रदेशात मतदानादरम्यान एका उमेदवाराचा पारा इतका चढली की त्याने थेट ईव्हीएम मशीन जमिनीवर आदळून फोडून टाकलं. महत्त्वाचं म्हणजे ईव्हीएम खराब झाल्याने उमेदवार नाराज नव्हता. पोलिसांनी उमेदवाराला अटक केली आहे.
 
 
आंध्र प्रदेशात लोकसभेसोबत विधानसभा निवडणुकीसाठीही मतदान होत आहे. अनंतपूर जिल्ह्यातील गुंताकल विधानसभा क्षेत्रातील मतदान केंद्रावर जन सेना पक्षाचे उमेदवार मधुसूदन गुप्ता मतदान कऱण्यासाठी पोहोचले होते. यावेळी त्यांनी ईव्हीएम मशीन उचलून जमिनीवर आदळल्यानंतर एकच गोंधळ उडाला होता.
 
 
 
लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघाचं नाव योग्य प्रकारे दिलं जात नसल्यावरुन मधूसुदन गुप्ता नाराज होते अशी माहिती मिळत आहे. यावरुन त्यांनी मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांशी वाद घालण्यास सुरुवात केली. गोंधळ झाल्याने काही वेळासाठी मतदान बंद झालं होतं. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि मधुसूदन गुप्ता यांना अटक केली. यावेळी त्यांनी पोलिसांसोबतही गैरवर्तवणूक केल्याचा आरोप आहे.