माधुरी दीक्षित होणार गायिका
   दिनांक :11-Apr-2019
मुंबईः
आपल्या कसदार अभिनयानं आणि नृत्यानं अवघ्या बॉलिवूडला भूरळ पाडणारी 'धक धक गर्ल' माधुरी दीक्षित आता गायन क्षेत्रात आपलं नशिब आजमवणार आहे. मिड डेनं दिलेल्या वृत्तानुसार माधुरीनं एका इंग्लिश अल्बममध्ये काही गाणी गायली आहेत. लवकरच हा अल्बम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
 
 
माधुरीनं 'गुलाब गँग' चित्रपटात रंगी सारी हे गाणं गायलं होतं. त्यानंतर आता ती पॉप म्युझिककडे वळली आहे. हा एक इंग्लिश अल्बम असून त्यात सहा गाणी आहेत, असं माधुरीनं सांगितलं आहे. या गाण्यांचं रेकॉर्डिंग पूर्ण झालं आहे. माधुरी सध्या काही चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र असल्यामुळं गाण्यांचं चित्रीकरण लांबणीवर पडलं असल्याचं सांगण्यात येत आहे.
माधुरी दीक्षितचा १७ एप्रिलला 'कलंक' चित्रपट प्रदर्शित होतोय. या चित्रपटातील माधुरीच्या 'घर मोहे परदेसिया' आणि 'तबाह हो गया' या गाण्यांना प्रेक्षकांनी भरभरुन दाद दिली आहे. भारत-पाक फाळणीच्या दाहक अनुभवावर 'कलंक' चित्रपट आधारलेला आहे अशी चर्चा आहे.