'नमो' फूड्‌स पॅकेटवरून गदारोळ
   दिनांक :11-Apr-2019
नवी दिल्ली,
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान सुरु असताना नोएडातील गौतम बुद्धनगर मतदारसंघात भाजपाचा प्रचार करणारी 'नमो फूड्‌स' नावाच्या नाश्त्याच्या पॅकेट्सचे वाटप करण्यात आल्याने एकाच खळबळ उडाली. खुद्द पोलिसांनाच ती देण्यात आल्याची बातमी सर्वत्र पसरली. यामुळे निवडणूक आचारसंहितेचा भंग तर झाला नाही ना, यासाठी उत्तरप्रदेशचे निवडणूक आयुक्त व्यंकटेश्वरलू यांनी नोएडाच्या जिल्हाधिकार्‍यांकडे अहवाल मागविला आहे.
 
 
परंतु, नमो फूड्‌स वाटपप्रकरणी गौतम बुद्ध नगरच्या वरिष्ठ पोलिस अधीक्षक वैभव कृष्णा यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना यात काही गैर नसल्याचे सांगितले. मतदान केंद्राजवळ वाटण्यात आलेल्या फूड पॅकेट्सचा भारतीय जनता पार्टीशी संबंध नसल्याचं ते म्हणाले. नमो फूड पॅकेट पोलिसांना कुठल्याही राजकीय पक्षाकडून वाटण्यात आले नसून, ही केवळ अफवा असल्याचे कृष्णा यांनी सांगितले.
 
'राजकीय पक्षाच्या वतीने पोलिसांकडून खाद्यपदार्थांच्या पाकिटांचे वाटप करण्यात आल्याची माहिती काही जणांनी पसरवली. ती अतिशय चुकीची आहे. ते खाद्यपदार्थ नमो फूड शॉपमधून मागवण्यात आले होते. त्यामुळे त्यावर नमो असा उल्लेख होता. एखाद्या दुकानातून पदार्थ खरेदी करू नका, अशी कोणतीही अधिकृत सूचना देण्यात आलेली नाही,' असे कृष्णा यांनी सांगितले.
 
भाजपाच्या प्रचार अभियानात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख अनेकदा नमो असा केला जातो. त्यामुळे ही फूड पॅकेट्स भाजपाकडून वाटण्यात आली, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.