अभिनेत्री सारा अली खानविरोधात तक्रार दाखल
   दिनांक :11-Apr-2019
दिल्लीः
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमुळं अभिनेत्री सारा अली खान चांगलीच अडचणीत आली आहे. अलिकडेच, दिल्लीच्या रस्त्यांवर अभिनेता कार्तिक आर्यनसोबत सारा विनाहेल्मेट बाईकवर फिरतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामुळं तिला सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी बरेच उपदेश दिले. तर, काहींनी थेट दिल्ली पोलिसांनाच हा व्हिडिओ टॅग केला होता. पोलिसांनीदेखील याची दखल घेत साराला नोटीस बजावली आहे.
 
 
सारा आणि कार्तिक आर्यन 'लव आज कल २' चित्रपटाच्या शूटिंगसाठी दिल्लीत आहे. त्यावेळी, कार्तिक आर्यनसोबत बाईकवरून फिरताना सारानं हेल्मेट घातलं नव्हतं. काही नेटकऱ्यांनी ही गोष्ट पोलिसांच्या लक्षात आणून देताचं पोलिसांनी साराविरोधात विनाहेल्मेट दुचाकीस्वाराच्या मागे बसल्याची तक्रार दाखल केली आहे. तसंच, वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्यामुळं ट्रॅफिक पोलीस कारवाई करू शकतात अशी नोटीस साराला बजावण्यात आली आहे. २००९ साली प्रदर्शित झालेला सैफ अली खान आणि दीपिका पदुकोणचा ‘लव्ह आज कल’ हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर हिट ठरला होता. त्याचाच हा सिक्वेल आहे.