स्मृती इराणी यांचा उमेदवारी अर्ज दाखल
   दिनांक :11-Apr-2019
अमेठी:
 केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी आज गुरुवारी अमेठी लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या स्वीय सचिवासह अन्य अधिकार्‍यांवर आयकर खात्याने नुकत्याच टाकलेल्या छाप्यांमध्ये शेकडो कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली, यावर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी बोलायला हवे, असे थेट आव्हान स्मृती इराणी यांनी दिले.
 
 
 
तीन दिवस चाललेल्या या छाप्यांमध्ये २८१ कोटी रुपयांची बेहिशेबी रोख रक्कम आयकर खात्याने जप्त केली आहे. याशिवाय, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानेही, दिल्लीच्या तुघलक रोड भागात राहणार्‍या एका मोठ्या राजकीय पक्षाच्या नेत्याच्या घरातून २० कोटी रुपयांची रोख ताब्यात घेतली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात पैसा कशासाठी आणला होता, निवडणुकीत मतदारांना लाच देण्याकरिता तो आणला होता, याची माहिती राहुल गांधी यांनी देशाला द्यावी, असे स्मृती इराणी म्हणाल्या.
 

 
 
राहुल गांधी चौकीदारच चोर आहे, अशा बोंबा ठोकत असतात, मग त्यांनी मध्यप्रदेशातील हा सभ्य गृहस्थ कोण आहे, ज्याने तुघलक रोडवरील बड्या नेत्याला २० कोटी रुपये पाठविले, हे देखील सांगावे. काँग्रेसचे हे कोणत्या प्रकारचे राजकारण आहे? गरोदर महिला आणि गरीब मुलांच्या कल्याणाकरिता असलेला पैसा लुटून कॉंगे‘सचे नेते ते निवडणुकीत वापरत आहेत आणि त्यावर काँग्रेसचे नेतृत्व काहीच बोलत नाही? आणखी किती पाप कराल आणि ते लपवाल, असा सवाल त्यांनी केला.
 
पाच वर्षांपूर्वी नरेंद्र मोदी यांना भाजपाने पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर केले आणि निवडून आल्यानंतर मोदी यांनी पंतप्रधान म्हणून नव्हे, तर प्रधान सेवक म्हणून देशाची सेवा केली. या काळात भाजपाच्या कार्यकर्त्यांनी व सर्वसामान्य नागरिकांनी त्यांना बळकट केले. आताही जनतेचे प्रेम आणि विश्वास या बळावर मोदी यांच्याच नेतृत्वात केंद्रात सरकार येणार आहे, असा दावा स्मृती इराणी यांनी केला.