कार्यकर्त्यांच्या हाणामारीत दोन स्थानिक नेत्यांचा मृत्यू
   दिनांक :11-Apr-2019
आंध्र प्रदेशात तेलुगू देसम पार्टी आणि वायएसआर काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला असून यामध्ये टीडीपीचे सिद्दा भास्कर रेड्डी आणि वायएसआर काँग्रेसचे पुल्ला रेड्डी या दोन स्थानिक नेत्यांचा मृत्यू झाला आहे. अनंतपूर जिल्ह्यातील मीरापुरम येथे कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. सिद्दा भास्कर रेड्डी टीडीपीचे डमी एजंट म्हणून काम करत असल्याचा आरोप करत दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांसोबत भिडले होते.
 
 
आधी शाब्दिक चकमक सुरु होती. पण काही वेळातच कार्यकर्त्यांनी एकमेकांना काठ्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थितीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली.
टीडीपी नेता सिद्दा भास्कर रेड्डी आणि वायएसआर काँग्रेस पक्षाचे पुल्ला रेड्डी यांच्यासह अनेक कार्यकर्ते हाणामारीत जखमी झाले होते. उपचारासाठी त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल कऱण्यात आले. मात्र डॉक्टरांनी सिद्दा भास्कर रेड्डी आणि काँग्रेसचे पुल्ला रेड्डी यांना मृत घोषित केले.