अमेरिकेच्या विद्यापीठांमध्ये प्रवेश घेण्यापूर्वी पडताळणी करा
   दिनांक :11-Apr-2019
-भारतीय दूतावासाचा विद्यार्थ्यांना सल्ला 
 
अमेरिकेतील विद्यापीठांमध्ये शिक्षण घेण्यासाठी अनेक जण इच्छूक असतात. मात्र, अशा इच्छूकांना तिथल्या भारतीय दुतावासाने एक लाखमोलाचा सल्ला दिला आहे. ज्या विद्यापीठामध्ये तुम्हाला शिक्षण घ्यायचे आहे त्याची आधी संपूर्ण माहिती काढून घ्या आणि इथे आपली फसवणूक तर होणार नाही ना? याची खात्री करा.

 
 
 
गेल्या काही महिन्यांत सुमारे १०० भारतीय विद्यार्थ्यांना धक्का बसला होता. कारण, ज्या विद्यापीठात प्रवेशासाठी आपण फॉर्म भरला होता ते विद्यापीठ वास्तवात बनावट असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले होते. त्यामुळे भारतीय दुतावासाने त्यांना सांगितले आहे की, या विद्यार्थ्यांनी विशेषतः तीन गोष्टी लक्षात ठेवाव्यात की, संबंधीत विद्यापीठ कॅम्पसमधून चालवले जात आहे की, या विद्यापीठाकडे केवळ त्यांचे कार्यालय आणि वेबसाईट आहे. ज्याच्या माध्यमांतूनच ते हा कारभार चालवत आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे अशा विद्यापीठांकडे स्वतःचे शिक्षक आहेत की नाहीत. तसेच तिसरी गोष्ट म्हणजे संबंधित विद्यापीठाचा अभ्यासक्रम काय आहे. ते नियमाप्रमाणे वर्ग चालवतात का?
दुतावासाने पुढे म्हटले की, विद्यापीठात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकडे नियमित व्हिसा असला तरी ते कायद्याच्या कचाट्यात अडकू शकतात. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना आपल्या स्वप्नांना तिलांजली देऊन पुन्हा भारतात परतावे लागेल. काही काळापूर्वी अमेरिकेच्या प्रशासनाने ‘पे टू स्टे’ व्हिजाचे रॅकेट उद्ध्वस्त करीत १२९ भारतीय विद्यार्थ्यांना अटक केली होती. ज्या विद्यार्थ्यांना अटक झाली होती त्यांनी बनावट विद्यापीठांमध्ये प्रवेश घेतला होता.
त्यामुळे याप्रकरणी भारतीय दुतावासाचे प्रवक्ते शंभू हक्की यांनी सांगितले की, भारतीय विद्यार्थ्यांनी कोणत्याही बनावट विद्यापीठाच्या जाळ्यात अडकू नये यासाठी त्यांनी अमेरिकेच्या विद्यापीठांमध्ये प्रवेश घेण्यापूर्वी चांगल्या प्रकारे पडताळणी करावी.