लहान मुलेही बुद्धीचे धनी असतात- तेव्हा...!
   दिनांक :12-Apr-2019
उज्ज्वला पाटील
७५८८७४३७२४ 
 
पाच-सात वर्षांचा एक मुलगा, रोजच्याप्रमाणे माझ्याकडे एक खेळ खेळायला आला. त्या खेळात काही कार्डस्‌ होते. अर्ध्या कार्डस्‌वर गणितीय सूत्रे अंकस्वरूपात मांडली होती. ज्यामध्ये अगदी बेसिक- मूलभूत क्रिया करून उत्तर काढायचे होते जसे- ५+३=८ किंवा ४३=१२ आणि काही कार्डस्‌वर या उत्तरांची संख्या येणारी चित्रे काढली होती. उत्तरे असणारी कार्डस्‌ त्या सूत्रे असणार्‍या कार्डस्‌बरोबर मॅच करायची होती. थोडक्यात, ‘चित्रांच्या कार्डस्‌मधील संख्या आणि उत्तर-कार्डस्‌ संख्या जोडणे’ असा तो खेळ होता. काही वेळ त्याने चित्रांमधील संख्या मोजून आणि संख्यावरील बेरजा-वजाबाक्या- (गुणाकार...?) करून पाच ते सहा कार्डस्‌ बरोब्बर मॅच केले, पण नंतर कदाचित त्याला ही बौद्धिक कवायत कंटाळवाणी वाटू लागली. मग त्याने काय केले? तर त्या कार्डच्या खालची बाजू जरा ‘नागमोडी’ वळणाची होती, त्या त्या कार्डस्‌ना शोधून त्याने ही सगळी उरलेली कार्डस्‌ पटापट जोडून टाकली. एका नागमोडी वळणात दुसरे बरोब्बर बसणारे नागमोडी वळणाचे कार्ड तो शोधत होता आणि मॅच करत होता. ही युक्ती त्याने स्वत:च शोधून काढली होती.
 
परंतु त्याच्या आईला (तीपण पूर्ण वेळ त्या क्लासला येत होतीच) त्याचे हे उत्तर शोधण्याचे सोपे तंत्र आवडले नाही. ती त्याला म्हणाली, ‘‘ए, हे नाही हं चालणार! तू चिटिंग केलंयस. तुला ते मोजून आणि त्या बेरजा (ॲडिशन्स-सबट्रॅक्शन्स) करूनच उत्तरे शोधायची होती...’’ तिने (आईने) क्लासच्या मॅडमना हे संगितले तर मॅडम म्हणाल्या, ‘‘अहो! चांगलंय्‌ की मग! उलट तुमच्या मुलामध्ये उपजतच अशा सोप्या ट्रिक्स शोधण्याचे स्कील आहे. आयुष्यात पुढे द्याव्या लागणार्‍या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्समध्ये हेच स्कील कामी येणार आहे!’’ ‘‘पण, त्याला मूळ क्रिया येणार नाहीत ना अशाने?’’ आईने गंभीर होऊन प्रश्न विचारला. मॅडम म्हणाल्या, ‘‘अहो, तुमच्या मुलात असणारे हे स्कील उपजतच आहे. वर्गातली इतर मुले ज्या वेळी आपल्या बुद्धीला ताण देत गणितं सोडवतील, त्या वेळी हा त्यातले सोपे टप्पे/युक्त्या शोधून काढेल... आणि काळजी करू नका. त्याच्यावर गणिताच्या मूळ क्रियांचे संस्कार होतीलच. शाळेत ते आहेच ना!’’
 
 
ती आई आणि तो मुलगा निघून गेला. मात्र, माझ्या मनात आले, अशा कितीतरी गोष्टी आहेत मानवी मेंदूमध्ये उपजतच, ज्याचा वापर कदाचित शालेय अभ्यासक्रम शिकत असताना होतच नाही किंवा फार कमी होतो. आता इतक्यातच प्रश्नपत्रिकांचे स्वरूप व गुणांचे वितरण यात बदल केले आहेत, पण तरीही हसतखेळत व काही वैशिष्ट्यपूर्ण खेळांच्या साहाय्याने मुलांच्या संपूर्ण मेंदूची वाढ, सगळ्या क्षमतांचा वापर वाढवता येऊ शकतो आणि या खेळांमुळे त्यांचे आपापसातील सौहार्दपूर्ण संबंध, संवादकौशल्य, आपला डाव येण्याची वाट पाहणे, सामाजिक समरसता, या गुणांचा विकास तर होतोच, पण याचबरोबर त्यांचा मोबाईल व टीव्हीमधला इंटरेस्ट कमी होतो, हेही लक्षात आले आहे.
 
स्लो लर्नर असलेल्या वर उल्लेख केलेल्या मुलाच्या बाबतीतला घडलेला प्रसंग सत्य घटना आहे. त्याच्यातील सूक्ष्म पातळीवर होणारे बदल आम्हाला जाणवत होते. चिडचिड कमी झाली होती, पेशन्स वाढला होता, इतर सवंगडी खेळत असताना ते कसे खेळतात, ते निरीक्षण करण्यात तो दंग राहात होता. दोन तास तहान, भूक, वळवळ, चुळबूळ यांपैकी काहीच नव्हते, एकाग्रता वाढली होती, तर्कशक्ती नक्कीच तो लावीत होता, मुख्य म्हणजे स्वत:चा वेगळा विचार करायला सुरवात झाली होती... त्याला इथले प्रत्येक खेळ खेळताना नवा उत्साह व चॅलेंज वाटत होते व तो अधिकाधिक आनंदाने नवनवीन खेळ खेळण्यासाठी अधीर होत होता. त्याच्या आईसाठी त्याच्यातले हे बदल अतिशय आनंददायी, पण खूपच नवीन होते. सतत तक्रारवजा सरळ नकार देणारा हा मुलगा, आमच्याकडे येण्यासाठी अगदी मागे लागत होता आईच्या! आणि त्या आईलाही मुलामध्ये होणारे हे बदल खूप सुखदायी वाटले होते. 
 
गेली तीन वर्षे असे खेळ घेऊन नागपूरमध्ये या मुलांच्या बदलांकडे आशादायी नजरेने बघणार्‍या आई-वडिलांची संख्या वाढत आहे. पुण्यामध्ये या ब्रेन गेम्सना अनेक शाळांनी स्वीकारलंय्‌. नागपूरमध्येही हा प्रयोग गेली तीन वर्षे सुरू आहे. आपले मूल हे उत्तम क्षमता घेऊन आलेलेच असते, मात्र त्याच्यातील या सर्व क्षमता- काही बोर्ड गेम्स, काही वैशिष्ट्यपूर्ण वर्कशीटस्‌ आणि काही गेम्स (खेळ) यांच्या माध्यमातून पूर्णपणे वापरल्या जातात. तितक्या प्रकारचा विचार करायला लागल्यामुळे मेंदूतील सर्व पेशी कामाला लागतात. नवीन कनेक्शन्स तयार होऊन त्याचा उपयोग शालेय अभ्यासक्रमातील कठीण भाग समजून घेण्यासाठी तसेच आकलनक्षमता वाढविण्यासाठी निश्चितच होतो, हे आज सिद्ध होत आहे. मुलांची निकोप वाढ होत असतानाच वेगवेगळ्या ‘स्ट्रॅटेजिक गेम्स’मुळे त्यांना पर्याय सुचायला लागतात.
 
‘आऊट ऑफ द बॉक्स’ विचार करणे, हे यामुळे साध्य होते. लॉजिकल गेम्समुळे विशिष्ट पद्धतीने विचार करणे, गेम्समधील नियम पाळणे हे होते व ते लॉजिक लावायला सहजपणे शिकतात. या सर्व गोष्टी पुढे त्याला शाळेत शिकण्यास मदत करतात. मुलांचा आत्मविश्वास नक्कीच वाढतो आणि एक नवे दालन उघडते. घरी गेल्यावर मुले आईवडिलांबरोबर बसून खेळण्याचा हट्ट धरतात. याचा फायदा हा होतो की, आईवडील व मुलांमधील संवाद वाढतो. प्रेम व विश्वास दृढ होतो. मुलातील अनेक गुण त्यांच्या नजरेला येतात, मुलाच्या वाढीकडे त्यांचे सकारात्मक पाऊल सरकते. कौटुंबिक स्वास्थ्य उत्तम होण्यास मदत होते. हे बदल महत्त्वाचे नाहीत का?
 
या वर्षीसुद्धा हे शिबिर २२ ते २७ एप्रिल असे ६ दिवस होणार आहे. आपल्या मुलांमधील सकारात्मक बदलांसाठी, घरातल्या तणावरहित वातावरणासाठी, आपापसातील सुमधुर संवादासाठी, आई-वडील व मुलातील उत्तम मैत्रीसाठी आणि मुख्य म्हणजे मुलांना टीव्ही व मोबाईल, लॅपटॉप, टॅब यापासून दूर ठेवण्यासाठी या शिबिराचा नक्की फायदा घ्यायला हवा, नाही का? मुलांमधील सुप्त गुणांचा परिचय व वाढ या दोहोंसाठी हे खूप गरजेचे आहे, हो ना?