शुगर आणि कोलेस्ट्रॉलवर नियंत्रणासाठी मेथीचे दाणे
   दिनांक :12-Apr-2019
मधुमेह आणि हृदयरोग हे सामान्यपणे प्रत्येकच घरांत राहणारे पाहुणे झाले आहेत. घरटी कुणालातरी या रोगांनी ग्रासलेले असते. त्यावर अनेक उपाय सांगितले जातात. नियमीत व्यायाम आणि आहारावर नियंत्रण हे तसे उत्तम उपाय आहे. मग खाण्या-पिण्यात काय असावे, याचाही नेमका विचार करायला हवा.
रक्तातील साखरेची किंवा कोलेस्ट्रॉलची उच्च पातळी यांच्यामुळे आरोग्याची इतरही गुंतागुंत होते. हैदराबादच्या राष्ट्रीय पोषाहार संस्थेनं आपल्या संशोधनांमधून निष्कर्ष काढला आहे की, मेथीचे दाणे या दोन्ही समस्यांवर उपयुक्त आहेत. अशा रुग्णांनी मेथीचे दाणे सेवन केल्यास नेहमीच्या नेमून दिलेल्या औषधांच्या उपचाराला जोड मिळते. मेथीचे दाणे किती प्रमाणात खावेत, ते खाण्याची पद्धत आणि इतर खबरदारी याची माहिती खाली दिलेली आहे.
 1. भारतीय स्वयंपाकामधे एक मसाला म्हणून वापरले जाणारे मेथीचे दाणे किराणा दुकानात मिळतात.
 2. या दाण्यांमध्ये चोथ्याचं प्रमाण अधिक असल्यानं (५० टक्के), ते मधुमेहावरील उपचारात, रक्त आणि लघवीतील साखर आणि उच्च सीरम कोलेस्ट्रॉल असणार्‍या रुग्णांमध्ये कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यात उपयुक्त ठरतात. मेथीचे कच्चे तसेच शिजवलेल्या दाण्यांमधे हे गुणधर्म असतात.
 3. मेथीची पानं (मेथी साग, एक हिरवी पालेभाजी म्हणून सामान्यपणे वापरली जाते) असा कोणताही प्रभाव दाखवू शकत नाहीत.
 4. मेथीचे दाणे खाण्याचं प्रमाण हे मधुमेहाची तीव्रता आणि सीरम कोलेस्ट्रॉलची पातळी यांच्यावर अवलंबून असतं. त्याचा डोस २५ ग्रॅम ते ५० ग्रॅम इतका असू शकतो.
 5. सुरुवातीला २५ ग्रॅम मेथीचे दाणे प्रत्येकी १२.५ ग्रॅमच्या दोन समान डोसमधे (अंदाजे दोन चहाचे चमचे) दोन मुख्य जेवणं दुपारचं आणि रात्रीचं, यांच्यासोबत घ्यावेत.
 6. हे दाणे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवल्यानंतर तसेच खावेत किंवा ते कुटून पाण्यात किंवा ताकात मिसळून, जेवणापूर्वी १५ मिनिटे खावेत.
 7. या दाण्यांची कडू चव कमी करण्यासाठी ठराविक प्रक्रिया करावी लागते. सध्या, कडवटपणा काढलेले मेथीचे दाणे बाजारात उपलब्ध नाहीत.
 8. दाण्यांचा लगदा (रात्रभर पाण्यात भिजवून ठेवल्यानंतर) किंवा भुकटी ही पोळ्या, दही, डोसा, इडली, पोंगल, उपमा, दलिया, ढोकळा, डाळ आणि भाज्यांची आमटी यात वापरता येते.
 9. रक्तातील आणि लघवीतील साखरेची उच्च पातळी आहे तोवर मेथीचे दाणे घ्यावेत.
 10. मेथीच्या दाण्यांच्या उपचारासोबतच चालणे यासारखा व्यायाम नियमित करण्यानंदेखील फायदा होतो. शरीराचं वजन कमी करण्यानंदेखील इन्शुलीनचं कार्य सुधारतं. त्यामुळे, संपृक्त चरबी आणि साधी साखर यांच्यापासून मिळणारे आहारातील उष्मांक कमी होतात.
 11. काही रुग्णांना मेथीचे दाणे सेवन केल्यानंतर सुरुवातीला अतिसार किंवा अति प्रमाणात वायू सरण्याचा त्रास होऊ शकतो.
 12. मेथीचे दाणे हे केवळ आहाराला पूरक असा उपचार आहे आणि नेहमीचे मधुमेह-विरोधी उपचार चालूच ठेवायचे आहेत. तथापि, मेथीदाण्यांचा वापर करण्यानं मधुमेह-विरोधी औषधांचा वापर कमी करता येतो. मधुमेह-विरोधी औषधांची वैयक्तिक कमाल मात्रा यासंबंधी सल्ला देता येणार नाही. आपल्या स्थितीच्या अनुसार केवळ आपले डॉक्टरच योग्य ते औषध आणि त्याचा डोस ठरवू शकतात. मधुमेहाची तीव्र गुंतागुंत झाल्यास तत्काळ वैद्यकीय सल्ला घ्यावा.