नवीन शिकत राहावं...
   दिनांक :12-Apr-2019
प्रॉक्सी थॉट  
 पल्लवी खताळ-जठार
 
मस्कार मैत्रिणींनो! आजचा लेख हा सुरभी ठाकूर, शोभा गुरव आणि पद्मा कदम यांच्या प्रश्नांवर प्रकाश टाकणारा आहे. या लेखातून तुम्ही तुमची समस्या दूर करावी, ही विनंती.
 
नवं शिकून आपण जुने झालो, असं वाटत असतानाच कुठंतरी खूप काही शिकायचं राहिलं, असं वाटायला लागतं नाही का? त्यात चाळीशी जवळ आल्यावर माझ्यासारख्या अनेक मैत्रिणींना याचे भान येते, मग काय विविध पुस्तके, माहिती नेट सर्फिंग करता करता त्यांना आपलं तर या सर्व संसारगाड्यात खूप काही नवनवीन शिकायचं राहिलंय्‌, हे फारच प्रकर्षाने जाणवायला लागतं. त्यात आता नवीन शिकायचे वय होऊन गेलंय्‌, याची सगळ्यांनी अगदी डोळ्यांनी चष्मा ठेऊन, हाता पायांनी थोडीशी गती कमी झाल्याचे दाखवून तर आणखी काही कारणांनी घरच्यांनी जाणीव करून दिलेली असते. अग बाई! हो (बाईच झालेलो असतो) तुला आता हे जमेल का? वगैरे वाक्यांनी मग आपणही स्वतःला तोच प्रश्न विचारत काही अजून महिने वर्षांची भर पडते.
 
तोवर काय काय राहिलंय्‌, याची यादी मन सतत करतच असते. हळूच मुलांची पुस्तके वह्या चाळून काही माहिती मिळते का बघणे, मुलांचे करता करता विसरलेली आपली स्वप्नं, ध्येय, आवड गाठोड्यातून बाहेर काढून ठेवताना कोण आनंद तर झालेलाच असतो; पण आता ‘‘हे ग काय खूळ डोक्यात घेऊन बसलीय्‌!’’ अशी ओरड व चिंता तर व्यक्त होणार नाही ना, या संभ्रमात मग आपण हिरमुसले होऊन जातो.
 
 
 
 
छोटीशी मज्जा आठवते, ती सांगते-
मुलं अगदीच शाळेत जात होती. इंग्रजी माध्यम, त्यांचा अभ्यास घेता घेता फाडफाड इंग्रजी बोलता येत नाही, याची खंत वाटायला लागली. मुलांच्या शाळेत सोडायच्या वाटेवर तेव्हा नुकतेच फाडफाड इंग्रजी बोलायला शिका अमुक दिवसांत... अशी जाहिरात बघून आम्ही सहा जणी मम्म्यांनी प्रवेश घेतला. वही-पेन घेऊन जाऊन बसायचो. सर आमच्या एवढेच असावेत. रोज शब्द वदवून घ्यायचे, मग वाक्यं मग सगळं असं आम्ही कलासमध्ये एकमेकींतच खूप प्रॅक्टिस करायचो, मस्त वाटायचे!
तसं बोलायला- लिहायला वाचायला यायचं, पण ते मुलांसारखे सुपिरिअर वगैरेसाठी हा खटाटोप! मग क्लासबाहेर आलो की दोन चार पावले पुन्हा इंग्लिशमधेच बोलू ठरवलं असायचे; पण काही मिनिटं गेली की अपार भयाण शांतता चालताना, कारण मनातल्या मनात वाक्याची जुळणी करून ती दुसरीला सांगेपर्यंत घर यायचं. शेवटी भराभर मराठीत बोलून आम्ही फिदीफिदी हसतच (मराठीतच) पोहोचायचो.
 
पुन्हा घरी रात्री मुलांचा अभ्यास घेताना, जेवायला बोलवताना काही काम सांगताना त्यांच्याशी व त्यांनी माझ्याशी इंग्लिशमध्येच बोलायचं, हा नियम मी घातला होता. बिचारी पोरं आमची, वैतागून जायची कधी सुधारणा करायची? त्यांची आई खर्‍या अर्थाने मॉम झाली होती, संवादच बंद, मग रागवायचे तर जोरात पट्‌कन मराठीच यायचे; हसून बेजार, अशा प्रकारे इंग्रजी कोर्स आम्ही पूर्ण केला की आमच्या मास्तरांनी आम्हाला झालं आता; जावा घराकडे म्हणून हाकलले आता आठवत नाही!
 
असं काहीतरी आवड म्हणून शिकणं, कधी कोणासाठी छानसे भविष्य घेऊन येते, त्यातली एक इंग्रजी माध्यमिक शिक्षिका झाली. आम्हीही तसे थोडेफार गरजेपुरते बोलतोच, असे किती जणींचे किती तरी नवे शिकण्यासाठी धडपड अनुभव असतात. तेव्हा स्कूटर कोर्स, फोर व्हीलर, योगा असे सगळे नवलाईने केलेलं प्रशिक्षण खूप उपयोगी ठरलं. या गोष्टी अतिशय प्राथमिक दर्जाच्या तुम्हला वाटत असल्या तरी त्या अनेकींना खूप मोठ्या महत्त्वाच्या वाटू शकतात, ठरतात, हीच नवीन शिकण्याची ओढ सतत मनात ताजी असल्याने पुढे ही भटकंती दरम्यान मी विविध प्रकारचे साहस करायचे धाडस केले. ट्रेिंकग असो की खोल समुद्रात कधीच पोहायला न शिकता केलेलं स्कूबा डायिंवग (जे इतरांसाठी खूप सोपे असते, ते आम्हा महिलांना धाडसाचे वाटू शकते) ही नवं शिकण्यातली मजा वेळ खूप काही शिकवून जाते.
 
अनेक प्रसंग, तडजोड, प्रेरणा, जिद्द, मनोबल या सगळ्या आपल्यात वास्तवास होत्या याची जाणीव होते. असेच शैक्षणिक क्षेत्रात आपल्या राहिलेल्या विषयाची पुन्हा प्रवेश व अभ्यास परीक्षा याही महत्त्वाच्या असतात. त्यातलीच जर्नालिझमची माझी पदवी मला नवीन अनुभव आणि एक मानसन्मान व चांगले-वाईट अनुभव देऊन गेली. लेखणीला धार आली. काही मुलाखती घेतल्या. लिहिल्या छापल्या. काही टीव्हीवर प्रसारित केल्या गेल्या. हे अनुभव अत्यांत सुंदर असेच होते. अनेक फजितीचे प्रसंगही आले. तर असेच आणि त्यामुळेच नुकतेच मुंबई येथे झालेल्या महिलांच्या क्रिकेटमध्ये (ज्याचा स्वप्नातही कधी विचार केला नव्हता) भाग घेऊन तो सामना जिंकण्याचे थ्रिल अनुभवायला मिळाले हेही नसे थोडके!
 
नवं शिकत राहणे जितकं महत्त्वाचं तेवढं तुमचं स्वतःची इच्छा, घरातला सपोर्ट खूप महत्त्वाचा़! जो मला मिळत गेला, मुलांचे आईसाठी कौतुक शुभेच्छा मनाला समाधान देऊन जातात. त्यांचे करिअरचे वय असूनही ते मला प्रोत्साहित करतात.
तर सख्यांनो, तुम्ही असं नवं शिकताना कायम उत्साही, आनंदी राहता आणि इतरांनाही जाणून घ्यायला लागता. नेहमी नवं शिकत राहावं. चित्रकला, खेळ, लेखन असो की शिक्षण, अनेक मार्ग सोयीसुविधा आज उपलब्ध आहेत. त्याला वयाचे बंधन न घालता शिकावे. तुम्हाला हे सगळं खूप समृद्ध करत जीवन जगायला शिकवतात, मरगळ दूर करून उत्साही बनवतात असं मला वाटतं. माझं हे अगदीच साधंसं शिकणं हे प्रेरणादायी; याहीपेक्षा बरेच सुंदर मोठं कार्य करणार्‍या महिलांसमोर काहीच नसले तरी, मी काही करू शकणार नाही, आपल्याला जमणार नाही असे मन खचलेल्या माझ्या मैत्रिणीसाठी नक्कीच उपयोगी ठरेल. तर मग काय ठरवलंय्‌ तुम्ही नवं शिकायचं?
 
 
प्रॉक्सी थॉटमध्ये तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करील. त्याकरिता तुम्हाला मोजक्या शब्दांत तुमचा प्रश्न, तुमच्या मुलाचे वय, तुमचे संपूर्ण नाव लिहून [email protected] वर मेल करायचा आहे.