खासदार आणि त्यांचे सहकारी, कर्मचारी : एक वस्तुस्थिती
   दिनांक :12-Apr-2019
दत्तात्रय आंबुलकर 
 
जनप्रतिनिधी म्हणून खासदारांना सहकारी-कर्मचारी नेमण्याची तरतूद असते. मात्र अशा प्रकारे खासदार म्हणून आपले सहकारी-कर्मचारी नेतमताना सध्याच्या म्हणजेच 15 व्या लोकसभेतील तब्बल 146 खासदारांनी आपल्या पत्नीसह विभिन्न नातेवाईकांचीच नेमणूक केल्याची लक्षणीय बाब उजेडात आली असून त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-
 
महिती अधिकारांतगत उपलब्ध माहितीनुसार सध्याच्या 146 खासदारांपैकी लोकसभेच्या 104 तर राज्यसभेच्या 42 सदस्यांनी मिळून त्यांच्या 191 नातेवाईकांची नेमणूक त्यांच्या वैयक्तिक कार्यालयीन वा स्वीय-सहाय्यक स्वरूपात केली असून या नातेवाईकांमध्ये या खासदारांच्या मुले, मुली, पत्नी, भाऊ बहीण व इतर जवळच्या नातेवाईकांचा प्रामुख्याने व आवर्जून समावेश करण्यात आला आहे हे या संदर्भात उल्लेखनीय आहे.
 
 
प्रचलित नियमांनुसार लोकसभा व राजयसभा सदस्य असणार्‍या खासदारांना त्यांच्या वैयक्तिक कार्यालयीन सहाय्यकांच्या पगारापोटी दरमहा 30,000 रु. वेतनापोटी देण्याची तरतूद आहे. ही रक्कम संबंधित खासदार आपल्या कार्यालयीन एका अथवा एकाहून अधिक कर्मचार्‍याला देता येते.
 
खासदारांनी आपले सहाय्यक आणि कर्मचारी म्हणून ज्या नातेवाईकांची सध्या नेमणूक केली आहे याचा नातेवाईकांच्या पसंती क्रमवारीनुसार सांगायचे झाल्यास 60 खासदारांनी आपल्या मुलांना, 36 जणांनी आपल्या पत्नीला, 26 खासदारांनी मुलींना, प्रत्येकी 6 जणांनी आपले भाऊ आणि सुनांना, 4 महिला खासदारांनी आपल्या पतीला तर 10 जणांनी आपल्या इतर पण जवळच्या नात्यातील मंडळींनाच आपले सहकारी-कर्मचारी म्हणून राजरोसपणे नेमले आहे.
 
आपल्या कर्मचारी सहाय्यक पदांवर आपल्या नातेवाईकांची वरीलप्रमाणे वर्णी लावण्यामध्ये सर्वपक्षीय खासदार समाविष्ट असल्याचे पण यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे. यासंदर्भात खासदारांचा पक्षनिहाय तपशील सांगायचा म्हणजे यासंदर्भातील एकूण 146 खासदारांपैकी सर्वाधिक म्हणजेच 38 खासदार भाजपचे आहेत तर त्यानंतर अशा खासदारांची पक्षनिहाय क्रमवारी म्हणजे कॉंग्रेसचे 36, बसपाचे 15, समाजवादी पक्षाचे 12, द्रमुकचे 8, बिजू जनतादलाचे 7 तर जनतादल (धर्मनिरपेक्ष)च्या 6 खासदारांचा प्रामुख्याने समावेश आहे.
 
वर नमूद केलेल्या 146 खासदारांपैकी 36 खासदारांनी तर आपल्या एकाहून अधिक नातेवाईकांची आपले सहकारी कर्मचारी म्हणून लावली आहे तर 4 खासदारांनी 3 नातेवाईकांची वर्णी लावली आहे. या खासदारांच्या नातेवाईक-कर्मचार्‍यांना दरमहा 30000 रु. चा पगार पगार-मानधन देय असतेच.
  
- Ads-
तरुण भारतचे फेसबुक पेज लाईक करा
 
 
खासदारांच्या मुला-मुलींच्या नेमणुकीच्या संदर्भात सांगायचे झाल्यास एम. के विश्वमुहैरी (असम), निखिल कुमार चौधरी (बिहार), मोहंमद अली खान (आंध्र प्रदेश), एम. यंगवेलू (तामिळनाडू), दिलीपभाई पंड्या (गुजरात), अलिअन्वर अंसारी (बिहार) महम्मद अली व ब्रिजभूषणिंसह (दोघे उ.प्र.) या खासदारांनी आपल्या दोन दोन मुलांना तर समाजवादी पक्षाच्या उत्तर प्रदेशातील खासदार तुफानी सरोज यांनी आपल्या दोन मुलींनाच आपले स्वीय सचिव नेमण्याची वेगळीच शक्कल लढविली आहे.
 
खासदारांनी आपल्या जवळच्या नातेवाईकांनाच आपले सहकारी-कर्मचारी नेमण्याची ही पूर्वापार व पिढीजात परंपरा कायम राखत जम्मू-काश्मीरचे खासदार शरीफुद्दिन शरीक यांनी आपल्या नातू व नातीला तर जम्मू काश्मीरच्याच खासदार सैफुद्दिन यांनी आपल्या दोन नातींना आपल्या सचिव पदावर नेमून नवा घरगुती पायंडा थेट सांसदीय संदर्भात घातला आहे.