विसराळूपणाची कारणे
   दिनांक :12-Apr-2019
अनेकदा आपण आवर्जून लक्षात ठेवेलेल्या लहान सहान कामांचा आपल्याला वारंवार विसर पडतो. इतकेच नव्हे, तर स्वतःच्या खिश्यामध्ये किंवा पर्समध्ये जपून ठेवलेल्या किल्ली, मोबाईल फोन, चष्मा यांसारख्या वस्तू आपला जवळच आहेत, याचा साफ विसर पडून त्या घरभर शोधण्यात आपण हकनाक वेळ वाया घालवतो. अशा घटना प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये घडतच असतात, पण या वारंवार घडू लागल्या तर मात्र त्याकडे दुर्लक्ष न करता त्यामागे असलेली कारणे विचारात घेणे गरजेचे आहे. असा विसराळूपणा म्हणजे स्मृतिभ्रंश (अम्नेशिया/डीमेन्शिया) नसला, तरी याकडे दुर्लक्ष न करता जर त्यामागची कारणे शोधून काढली गेली, तर त्यानुसार वेळीच उपाययोजना करणे इष्ट ठरते. आपल्या विसराळूपणाबद्दल कोणताही कमीपणा वाटून न घेता त्यामागची कारणे लक्षात घेऊन त्यानुसार गरज वाटल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणेही अगत्याचे ठरते.
 
अनेकांचा कामाचा व्याप इतका असतो, की त्यापायी आलेल्या मानसिक ताणामुळे त्यांना पुरेशी झोप मिळत नाही. आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये मानसिक ताण कोणापासूनही लांब राहिलेला नाही. मग ती व्यक्ती घर जबाबदारीने सांभाळणारी गृहिणी असो, परीक्षेमध्ये मध्ये उत्तम मार्क्स मिळविण्याच्या इच्छेने त्यासाठी अतोनात प्रयत्न करणारा विद्यार्थीवर्ग असो, किंवा कामाच्या डेड लाईन्स कशा पूर्ण करायच्या याच्या विवंचनेत असलेली व्यावसायिक, नोकरदार मंडळी असोत, मानसिक तणाव हा सर्वांच्याच जीवनाचा अविभाज्य भाग झालेला आहे. या तणावामुळे जर झोप सातत्याने अपुरी राहत असेल, तर याचा थेट परिणाम मेंदूच्या कार्यशक्तीवर होत असतो. जर झोप अपुरी किंवा अशांत असेल तर याचा थेट परिणाम स्मृतीवर होत असल्याचे वैज्ञानिक म्हणतात. त्यामुळे आपली रात्रीची झोप शांत आणि गाढ कशी असेल याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
 
 
अनेकदा काही कारणाने नव्याने औषधपचार सुरू केल्याने क्वचित क्षणिक स्मृतिभ्रंश उद्भवू शकतो. विशेषतः अँटी हिस्टामाईन्स, म्हणजेच  ॲलर्जी रोखण्यासाठी वापरली जाणारी औषधे, किंवा अँटी डिप्रेसंट्स, झोपेच्या गोळ्या, सिगारेट किंवा तंबाखूचे व्यसन सोडविण्यासाठी केले जाणारे औषधोपचार अशा प्रकारच्या औषधांमुळे विसराळूपणा वाढू शकतो. त्यामुळे एखादी व्यक्ती अशा प्रकारचे औषधोपचार घेत असल्यास आणि त्यामुळे विसराळूपणा वाढत असल्याचे लक्षात आल्यास त्याविषयी डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषधे बदलून घेणे योग्य ठरते. तसेच ज्या व्यक्ती नैराश्याच्या आहारी गेल्या आहेत, किंवा ज्यांची मनस्थिती सातत्याने नकारात्मक आणि उदासीन असते, अशा व्यक्तींच्या मेंदूच्या कार्यशक्तीवर नकारात्मक परिणाम होऊन विसराळूपणा उद्भवू शकतो.
 
ज्या व्यक्तींच्या शरीरातील थायरॉईड ग्रंथी व्यवस्थित काम करीत नसेल, त्यांच्या बाबतीतही विसराळूपणा जास्त दिसून येतो. किंबहुना वैज्ञानिकांच्या मते ज्यांना हायपोथायरॉडीझम असते, त्या व्यक्तींमधील सुमारे ५६% व्यक्तींमध्ये विसराळूपणा थोड्याफार प्रमाणात आढळत असून सुमारे ८१% व्यक्तींच्या बाबतीत डिमेंशिया, म्हणजे स्मृतीभ्रंश होण्याचा धोका उद्भवू शकतो. त्यामुळे आपला विसराळूपणा वाढला असल्याचे लक्षात येताच थायरॉईड ग्रंथी व्यवस्थित सक्रीय आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी आवश्यक तपासण्या करून घेणे गरजेचे आहे. ज्या व्यक्तींना अचानक सायलेंट स्ट्रोक येऊन गेला असेल, आणि तो लक्षात आला नसेल त्यांच्या बाबतीतही विसराळूपणा वाढू शकतो. सामान्य स्ट्रोक आला तर त्याचे परिणाम वाचा, दृष्टी यांवर दिसून येत असतात, मात्र सायलेंट स्ट्रोकचे परिणाम स्मृतीवर होऊ शकतात. ज्या व्यक्तींना मद्यपानाचे व्यसन आहे, त्यांनाही अनकेदा मद्याच्या धुंदीमध्ये केलेली कोणतीही कृत्ये, धुंदी उतरल्यावर आठवत नाहीत. याला ब्रेन डेफिसिट म्हटले जाते.